डेंगाचीमेट येथे महोत्सव ; विद्याथी, महिला बचत गटाचा सहभाग

जव्हार तालुक्यातील डेंगाचीमेट येथील जयेश्वर विद्यामंदिर येथे शनिवारी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात परिसरातील विद्यार्थी, आदिवासी महिला, बचतगट यांनी सहभाग घेतला होता. रुचकर आणि पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद घ्यायला येथे अनेकांनी गर्दी केली होती.

जयश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट, जव्हार येथील बायफ मित्रमंडळ आणि जनजाती विकास मंच यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात शेकडो रानभाज्या आणि त्यांच्या रेसिपी बनवून प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. विद्यार्थी आणि महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांनी प्रत्येक रानभाजीचे महत्त्व आणि ती कशी तयार करतात याची माहिती दिली. कारटोली, लोती, माटभाजी, आंबाडा, शेवळा, रानआळू, टेटूची शेंगा, अळीव, उंबर, काकड, खुरसानी पाला, चाळा, देहगडी, चाया, कांद, मोख्याचापाला, तरवटा पाला, तेरा, खडक तेरा, उडीद पाला, कडवळ या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.