दोघींना अटक; मुलांना भीक मागायला लावणारी टोळी ताब्यात

रेल्वे स्थानकांमध्ये रात्रीच्या वेळेत आईच्या पुढय़ात झोपलेल्या बालकांचे अपहरण करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अनिता भोसले (३०) आणि सीमा पवार (३५) अशी अटकेत असलेल्या महिलांची नावे असून अपहरण केलेल्या बालकांचा वापर ते रेल्वे स्थानक आणि परिसरात भीक मागण्यासाठी करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून आठवडय़ाभरापूर्वी अपहरण झालेल्या प्राजक्ता (२)या मुलीची सुटका केली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १० परिसरातून आठवडय़ाभरापूर्वी प्राजक्ता नरवडे या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. प्राजक्ता ही तिची आई यमुना आणि भाऊ प्रेम याच्यासोबत जालना येथून ठाण्यात आली होती. २६ सप्टेंबरला यमुना या प्रेम आणि प्राजक्ता सोबत ठाणे स्थानक परिसरात झोपल्या असता तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर यमुना यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून सुरू होता.

मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होणराव यांचे पथक तपास करत असताना या प्रकरणातील आरोपी कुर्ला रेल्वे स्थानकात असल्याची माहिती पथकातील उपनिरीक्षक चिंतामणी शेलार यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकात मध्यरात्री काही भीक मागणाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी ही महिला परभणी येथे निघून गेल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर परभणी पोलिसांच्या मदतीने मध्यवर्ती कक्षाने अनिता भोसले हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता सीमा पवार  हिचेही नाव पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी सीमा आणि तिच्या ११ वर्षीय मुलासह ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी सीमाला अटक केली आहे. तसेच तिच्या तावडीतील प्राजक्ताची पोलिसांनी सुटका केली.

आधीच्या गुन्हांचा तपास

या टोळीने यापूर्वीही अनेक लहान मुलांचे अपहरण केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राजक्ता सुमारे आठवडाभर यमुना यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्या दररोज पाच वर्षीय मुलासह कोपरी पोलीस ठाण्यात खेटे घालत होत्या, मात्र मुलीचा ठाव-ठिकाणा मिळत नसल्याने त्या फार चिंतेत होत्या.