वसईतील गावांना पुरापासून संरक्षण मिळण्याचा दावा

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : अनधिकृत बांधकामे आणि पाण्याच्या नैसर्गिक निचऱ्याच्या मार्गावर झालेली अतिक्रमणे यामुळे वसईतील पूरस्थिती दरवर्षी गंभीर रूप घेऊ  लागलेली असतानाच या परिस्थितीवर मात करण्यासाठी वसईच्या पश्चिमेकडील शेकडो एकर मोकळ्या पडीक जागेवर विस्तीर्ण तलावाची निर्मिती करण्याची मागणी पुढे आली आहे. या ठिकाणी तलाव झाल्यास पडीक जमिनीच्या सभोवतालच्या परिसरातील पाणी तलावात येऊन पूरस्थितीतून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांच्या मध्ये पश्चिमेला जवळपास १५६६ एकर मोकळी जमीन आहे. सोपाऱ्यापासून गास, सनसिटी ते वसईपर्यंतचा हा विस्तीर्ण भूभाग आहे. ही जागा राज्य शासनाने १९५० च्या दशकात गोगटे सॉल्ट यांना मिठाच्या उत्पादनासाठी भाडेपट्टय़ाने दिली होती. काही वर्षांपूर्वीच हा करार संपला आहे. या जागेतून वसई तालुक्यातील गास, सोपारा, निर्मळ, वाघोली, नवाळे, सालोली, सांडोर, चुळणे, दिवाणमान, भुईगाव, गिरीज, आचोळे, नालासोपारा शहर आदी गावांतील पावसाळी पाणी जाते. पावसाळ्यात या जागेला खाडीचे स्वरूप येते. या जागेवर उद्योग केंद्र स्थापन करण्याची मागणी मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. यावर स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. ही जागा ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून राखीव ठेवण्याची मागणीही वसईतील काही सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

आता या जागेवर भव्य तलाव निर्माण करण्याची मागणी पुढे आली आहे. या ठिकाणी तलाव केल्यास या मोकळ्या जागेच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाणारे पुराचे सर्व पाणी या तलावात वळवता येईल. शिवाय या ठिकाणी ‘रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्पही राबवता येईल. हिवाळा आणि पावसाळ्यात या भागात दरवर्षी परदेशातील पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्या अधिवासाकरिताही योग्य वातावरण या ठिकाणी तयार होईल, असे वसईतील सामाजिक कार्यकर्ता नितीन म्हात्रे यांनी म्हटले आहे.

‘हरित वसई’ची अभयारण्याची मागणी

दुसरीकडे, संबंधित जागा राज्य शासनाने ताब्यात घेऊन त्यावर अभयारण्य उभारण्याची मागणी हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गास-अंबाडी रोड रस्त्यामुळे आधीच पर्यावरणाचे नुकसान झालेले आहे. ज्या खारजमिनीतून हा रस्ता गेला आहे, ती जागा पूर्वी उत्कृष्ट प्रतीच्या चिंबोरी जातीच्या खेकडय़ासाठी प्रसिद्ध होती. भरतीचे पाणी सर्वदूर पसरत असल्याने पूर्वी या जागेत सैबेरिया व ऑस्ट्रेलिया खंडातून पक्षी स्थलांतर करायचे. वसईचे हे वैभव आता लयास गेले आहे. या भागातील उरलेसुरले प्राणी तथा वनस्पती जीवन नष्ट होऊ  नये म्हणून प्रयत्न व्हायला हवेत. राज्य सरकारने ही जागा ताब्यात घेऊन या परिसराचे अभयारण्यात रूपांतर करावे, असे डाबरे यांनी म्हटले आहे.

गास, सोपारा, चुळणे, आचोळे गाव तसेच लगतच्या सर्व गावांतील पावसाळी पाण्याचा निचरा होऊन ते तलावात येईल. परिणामी गावात पूर येणार नाही. त्यामुळे पर्यावरण तथा महसूल विभागाशी चर्चा करून या जागेत तलाव निर्मिती करावी.

– नितीन म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता