दरातही घसरण; उत्पन्नावर परिणाम झाल्याची विक्रेत्यांकडून खंत

ठाणे : करोनाचे संकट असल्यामुळे अनेकांकडून दिवाळी साधेपणाने साजरी करण्यावर भर दिला जात आहे. याचा परिणाम कंदिलांच्या विक्रीवर झाला असून यंदा कंदिलाची मागणी ७५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कंदिलांच्या दरांमध्येही घसरण झाली आहे. मागणी घटल्यामुळे उत्पन्नांवर परिणाम झाल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी करोनाचे सावट असल्यामुळे बाजारपेठांमध्ये फारसा उत्साह अजूनही नाही. दरवर्षी या काळात कंदिलांना मोठी मागणी असते. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरातील कंदील विक्रेते विविध आकर्षक कंदील विक्रीसाठी आणतात. दिवाळीच्या पंधरा दिवस आधी या कंदिलांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा करोनामुळे ग्राहकांमध्ये कंदिलासाठी असलेले आकर्षणही कमी झाले असून त्यांच्या मागणीतही घट झाली आहे. कंदील खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अल्प प्रतिसाद पाहून विक्रेत्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंदिलांचे दर ५ ते ५०० रुपयांची कमी केले आहेत.

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर ठेऊन ठेपली असली तरी केवळ २५ टक्केच मालाची विक्री झाली असून उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत रमेश करांडे हे गेल्या १४ वर्षांपासून कंदील विकतात. यंदाही त्यांनी विक्रीसाठी ८० हजारांची गुंतवणूक केली होती. कंदिलाचे दरही त्यांनी यंदा कमी ठेवले होते. मात्र, तीन आठवडे आधीपासून विक्री सुरू करूनही आतापर्यंत केवळ ३० हजारांच्या मालाची विक्री झाली असल्याचे करांडे यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत मालाची विक्री झाली नाही तर मुद्दलही परत मिळणे अवघड होईल, असेही त्यांनी सांगितले. तर, स्थानकात परिसरात कंदिलांची विक्री करण्याऱ्या तेजस कनोजिया यांचीही अशीच परिस्थिती आहे. यंदा विक्री कमी झाल्यामुळे शिल्लक राहिलेला माल आता वर्षभर सांभाळून ठेवावा लागेल, असे कनोजिया यांनी सांगितले.

यंदा करोनामुळे सर्वावरच आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेत आहेत. म्हणून यंदाच्या वर्षी कंदिलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. 

– कैलाश देसले, कंदील विक्रेते