औषधांपासून खाटांपर्यंतच्या मागणीचे  दूरध्वनी, माहिती पुरवताना दमछाक

ठाणे : अविरत सुरू असलेले दूरध्वनी… पलीकडून रुग्णांच्या नातलगांची आर्जवे, रुग्णशय्या मिळवण्यासाठी विनवण्या, प्राणवायू- रेमडेसिविरसाठी सुरू असलेली चौकशी आणि या आपत्कालीन परिस्थितीतही प्रत्येकाशी शांतपणे तरीही तत्परतेने संवाद साधणारे आठ कर्मचारी. करोनाविषयक माहिती, सूचना, तक्रारींसाठी ठाणे महापालिकेने उभारलेल्या ‘वॉर रूम’मध्ये दिवसा-रात्री कोणत्याही प्रहरी गेल्यास दिसणारे हे चित्र. पालिकेने सुरू केलेल्या दहा मदतवाहिनी क्रमांकांची जबाबदारी हाताळत असलेल्या आठ कर्मचाऱ्यांचे येथे अक्षरश: क्षणाशी रण सुरू असते. महापालिका आयुक्तांनी बुधवारी या कक्षाची पाहणी केली असता त्यांना हाच अनुभव आला.

करोनाबाधितांना भासणारी तातडीची गरज, रुग्णशय्या, प्राणवायू, औषधे, इंजेक्शन या सर्वांसाठी मदत वा मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेने हाजुरी येथे ‘वॉर रूम’ सुरू केली आहे. यासाठी महापालिकेने १० वेगवेगळे मदत क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या मदत क्रमांकावर करोनाबाधित किंवा त्याच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास तात्काळ मदत केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या वॉर रूममध्ये अनेक वेळा संपर्क साधूनही फोन  उचलले जात नसल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेकडे येत होत्या. त्यानुसार, बुधवारी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या मदतकक्षाला भेट दिली. तेव्हा येथील दहा क्रमांकांची जबाबदारी सांभाळण्यासाठी आठ कर्मचारीच असल्याचे दिसून आले. यातील एखादा कर्मचारी जेवण्यासाठी किंवा कामानिमित्ताने बाहेर गेल्यास आणि एखाद्या रुग्णाने त्याच वेळी संपर्क साधल्यास त्याला मदत कशी केली जाणार, हा प्रश्न या वेळी उपस्थित झाला. त्यानंतर शर्मा यांनी उर्वरित दोन मोबाइल क्रमांकांसाठी तसेच अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शर्मा यांनी सर्व मदत क्रमांक सुरू आहेत की नाही, याचीही तपासणी करण्यासाठी सर्व मदत क्रमांकावर संपर्क साधला होता. वॉर रूममध्ये रुग्णालयांची यादी आहे. या यादीमध्ये रुग्णांसाठी किती खाटा शिल्लक आहेत त्याची माहिती अद्ययावत नव्हती.

‘ग्लोबल’च्या आग्रहामुळे पंचाईत

रुग्णसंख्या जशी वाढते आहे तसा या वॉर रूमवरील कामाचा ताणही वाढतो आहे. अनेकदा खासगी रुग्णालयांकडून वॉर रूमला हवी ती माहिती तात्काळ पुरवली जात नाही. त्यामुळे रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती देताना तारांबळ उडते, अशी तक्रार या ठिकाणच्या काही कर्मचाऱ्यांनी केली. दूरध्वनी करणाऱ्या बहुतांश रुग्णांना, नातेवाईकांना महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातच खाट हवी असते. सुरुवातीच्या काळात खासगी रुग्णालयांसाठी आग्रह धरला जात असे. आता मात्र चित्र नेमके उलट झाले आहे, अशी माहिती या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली. अनेक रुग्ण तसेच नातेवाईकांची खर्च करण्याची क्षमता असते. मात्र ग्लोबल रुग्णालयात यासंबंधीची औषधे तात्काळ उपलब्ध होतील असा समज अनेक नातेवाईकांचा असतो. त्यामुळे ग्लोबलच हवे असा हट्ट अनेक जण धरून बसतात, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहाता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वॉर रूममध्ये १० मदत क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. हे सर्व क्रमांक सुरू आहेत. एकाच वेळी अनेक जणांनी एखाद्या क्रमांकावर संपर्क साधल्यास फोन करणाऱ्या व्यक्तीला प्रतीक्षा करावी लागते. इतर मोबाइल क्रमांकावरही संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. – डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका