डोंबिवलीतील सावित्रीबाई नाटय़गृहातील कार्यक्रम रात्री अकरा वाजता संपल्यानंतर या भागात रिक्षा, बसची सुविधा नसल्याने नागरिकांना पायपीट करीत घरडा सर्कल किंवा बंदिश चौक गाठावा लागतो.  तेथेही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्याने रसिकांची दमछाक होते. त्यामुळे या परिसरात रात्री दहानंतर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी परिवहन समिती सदस्य श्रीकांत भिडे यांनी परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांच्याकडे केली आहे.
नाटय़गृहाजवळ रिक्षेने थेट जाण्यासाठी रिक्षा चालक दिवसा ६० ते ७० रुपये भाडे सांगतो. रात्रीच्या वेळेत हा दर ८० ते ९० रुपयांपर्यंत असतो. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड होतो. नाटय़गृहापर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा नाही. एमआयडीसीच्या निवासी बस घरडा सर्कल, एमआयडीसी कार्यालयाजवळून पुढे जातात. या बस घरडा सर्कल, बंदिश हॉटेल चौक, सावित्रीबाई फुले नाटय़गृह ते माऊली सभागृहाजवळून नेल्या तर नाटय़ रसिकांची सोय होणार आहे. यापूर्वी ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, यामध्ये तोटा होत असल्याचे कारण देऊन या वळण फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, परिवहन विभागाने या वळण रस्त्याने एमआयडीसी निवासी विभागातील बस सोडाव्यात, अशी श्रीकांत भिडे यांनी मागणी केली आहे.