ठाणे : महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून या केंद्रांवर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण पुन्हा करण्यास परवानगी देण्याची मागणी होत असून यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठविले आहे.

राज्य सरकारने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण सुरू केले होते. लशींच्या तुटवडय़ामुळे काही दिवसांतच या वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले. शहरात सद्यस्थितीत ४५ पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी उपलब्ध लशींच्या साठय़ानुसार लसीकरणाचे नियोजन आखले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. ४५ वयोगटातील नागरिकांच्या पहिला मात्रेचे लसीकरण पूर्ण होत आले असावे. त्यामुळेच ही गर्दी कमी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याआधारे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठविले असून त्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.