कल्याण-डोंबिवली शहराजवळील २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन चार महिने उलटले तरी या गावांतील शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळत नव्हता. या कर्मचाऱ्यांना हा भत्ता तातडीने देण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. मोते यांनी राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण उपसंचालक, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, ठाणे जिल्ह्य़ाचे शिक्षणाधिकारी व वेतन पथकाचे अधीक्षक यांना २७ जुलै रोजी पत्र दिले होते. अद्यापही ३० टक्के घरभाडे भत्ता देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याने प्रशासनाविरोधात मोते यांच्या नेतृत्वाखाली गावांमधील शिक्षक आंदोलन छेडणार आहेत. राज्य शासनाने ११ मार्च २०१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार कल्याण डोंबिवली क्षेत्रालगतची सुमारे २७ गावे मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडे भत्ता बंधनकारक आहे. शासनाने समाविष्ट केलेल्या गावांमध्ये अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अन्य शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाची अधिसूचना निघाल्यानंतर घरभाडे भत्ता देण्यास कोणताही वेगळा शासन आदेश निघण्याची आवश्यकता नसल्याने तातडीने ३० टक्के घरभाडे भत्ता मंजूर करावा, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.