कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील एकाही प्रभाग क्षेत्रात बेकायदा बांधकाम होता कामा नये आणि शहरात सुरू असलेली बेकायदा बांधकामे तात्काळ जमीनदोस्त करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टाळेबंदीत शिथिलीकरणानंतर गेल्या तीन महिन्यांपासून गल्लीबोळ, आरक्षित जागा, चाळी तोडून इमारती उभारणीची बेकायदा बांधकामे भूमाफियांकडून सुरू आहेत. सर्वाधिक बेकायदा बांधकामे टिटवाळा, कल्याण पूर्वेतील ज आणि ड, डोंबिवली पूर्वेतील ग, पश्चिमेतील ह प्रभागांच्या हद्दीत सुरू आहेत. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’ या सहदैनिकामध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी घेतली आहे. बेकायदा बांधकामामध्ये आजी-माजी कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांची नावे मुख्यालयाला कळविण्यात यावीत. दर शुक्रवारी प्रभागात किती अतिक्रमणे उभी राहिली, किती बांधकामांना नोटिसा दिल्या, किती बांधकामे जमीनदोस्त केली. या बांधकामाचे जमीन मालक, भोगवटाधारक कोण, बांधकाम कोण करतेय याचा सविस्तर अहवाल प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांना सादर करावा, असे आदेश आयुक्त सुर्यवंशी यांनी दिले आहेत. ही सर्व माहिती संकलित करून ती प्रसिध्द करण्यात येणार आहे. बेकायदा बांधकामे निष्कासित करून बांधकाम करणाऱ्यांवर ‘एमआरटीपी’चे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. प्रभागात बांधकामे उभी राहत असताना कारवाई केली जात नसल्याबद्दल अतिक्रमण नियंत्रणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रभाग अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असल्याचे समजते. तसेच प्रभागात बांधकामे उभे राहत असताना कारवाई केली नाहीतर आणि त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांवर नागरी सेवा शिस्त नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा या उच्चपदस्थाने प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.

बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेत. प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम होता कामा नये. दर आठवडय़ाला प्रभागातील बेकायदा बांधकामे आणि त्यांच्यावरील कारवाईची माहिती अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांना सादर करण्याचे आदेश दिलेत. ही सर्व माहिती एकत्रित करून बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम व्यापक प्रमाणात हाती घेण्यात येणार आहे. 

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका

डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागात सुरू असलेल्या सर्व बेकायदा बांधकामांची माहिती जमा केली आहे. या प्रकरणी संबंधितांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. २० ऑक्टोबरनंतर सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात येणार आहे.

भारत पवार, प्रभाग अधिकारी, ह प्रभाग, डोंबिवली पश्चिम