प्रत्येकी ६० टन वजनाचे दोन कप्पे अवघ्या दीड तासात काढण्यात यश

चारशे आणि सहाशे टन वजनाच्या दोन शक्तिशाली क्राऊल क्रेन, सोबतीला साडेतीनशेहून अधिक रेल्वे कर्मचारी- अधिकाऱ्यांचा ताफा, अत्याधुनिक अशी यंत्रसामग्री आणि १०४ वर्षे जुन्या पत्रीपुलाचे तोडकाम ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जमलेले कल्याण-डोंबिवलीकर.. अशा वातावरणात मध्य रेल्वे मार्गावरील हा पूल रविवारी दुपारी साडेसहा तासांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांनी रेल्वे मार्गापासून दूर करण्यात आला.

या पुलाचे ५४ मीटर लांबीचे आणि प्रत्येकी ६० टन वजनाचे दोन कप्पे (स्पॅन) जेमतेम दीड तासात काढण्यात आले. पुलाखालील २५ हजार व्होल्ट विद्युतप्रवाह असलेली ओव्हर हेड वाहिनी तासाभरात हटवून हे काम पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर ही विद्युतवाहिनी पूर्ववत करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हा पत्रीपूल धोकादायक घोषित केल्यानंतर ऑगस्ट २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद होता. साधारण सप्टेंबरपासून पुलाच्या तोडकामास सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला पुलावरील जाहिरातीचे खांब हटविणे, त्यानंतर डांबर काढणे अशी कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रविवारी सहा तासांत हा पूल पूर्णपणे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून पुलाजवळ पाडकामाची यंत्रणा आणली होती. दोन दिवस अवजड क्रेन आणि विविध सुटय़ा भागांची जुळवाजुळव सुरू होती. पाडकामासाठी सहा तासांचा रेल्वेचा मेगा ब्लॉक असला तरी हे काम वेळेआधीच पूर्ण व्हावे असे नियोजन रेल्वे अभियांत्रिकी विभाग, ठेकेदार कंपनीने केले होते. पाडकामाच्या दोन दिवस अगोदर बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजीव मिश्रा, मुख्य प्रशासकीय अभियंता एस. के. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेनने पूल अलगद उचलण्याचे काम सोपे व्हावे म्हणून पुलाचे स्क्रू, जोडसांधे सुटे करण्याचे काम करून ठेवण्यात आले होते. १९१४ साली बांधलेला पत्रीपूल अलगद उचलायचा म्हणजे काही धोके होते. याच पुलास लागून दुसरा नवा पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरील १२० टन वजनाचे दोन स्पॅन कसे उचलायचे याचा सविस्तर अभ्यास केला होता, असे रेल्वेचे मुख्य अभियंता संतोष अग्रवाल यांनी सांगितले.

मोहीम फत्ते!

सकाळी ८ वाजल्यापासून ३०० कर्मचारी आणि ५० अभियंते हे कामाच्या ठिकाणी उपस्थित झाले. आधी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामास सुरुवात करण्यात आली. पुलाचे सुट्टे दोन वेगळे भाग असल्याने दोन विभागांत तोडकाम करण्यात आले.

९.३० ते ११.००

दोन अजस्र क्राऊल क्रेन पुलाच्या दोन्ही बाजूला आणून त्यांची योग्य जुळवाजुळव करण्यात आली.   कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पत्रीपुलाखालील सर्व ओव्हरहेड वाहिन्या हटवण्यात आल्या.

११ ते ११.४५

या कालावधीत पुलाचा एका बाजूचा ६० टनांचा भाग अजस्र क्राऊल क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आला.

१२ ते १२.४५

पुलाचा ९० टनांचा भाग उचलून हा रेल्वे रुळाजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. सुरुवातीला हा भाग ६० टनांचाच वाटल्याने रेल्वे प्रशासनाने पहिल्याप्रमाणेच हा भाग उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र याचे वजन     हे पहिल्यापेक्षा ३० टनांनी जास्त असल्याने अधिक लक्षपूर्वक हा भाग उचलून वेगळा ठेवण्यात अभियंत्यांना यश आले.

१२.४५ ते १.१५

पूल रेल्वे रुळांवरून पूर्णपणे बाजूला हटवण्यात आला. अजस्र असे ६०० आणि ४०० टनांचे दोन क्राऊल क्रेन पाठीमागे घेण्यात आले. पूल हटवण्याच्या कामात दिशा देण्यासाठी बांधण्यात आलेले दोरखंड काढण्यात आले.

१.१५ ते ३.३०

काढण्यात आलेल्या सर्व ओव्हरहेड वाहिन्या पुन्हा पूर्वावस्थेत बसवण्यात आल्या. रेल्वे मार्गावर करण्यात आलेले सर्व अडथळे या कालावधीत दूर करण्यात आले. दुपारी ३ वाजताकल्याणहून मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली.

वेळेआधीच काम पूर्ण

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वेचे ३०० कामगार, ५० तज्ज्ञ रेल्वे अभियंता यांची वेगवेगळी पथके गटागटाने रेल्वे मार्गावर तसेच पुलावर उतरली. नेतिवली बाजूकडील २७ मीटर लांब, ६० टन वजनाचा पुलाचा टप्पा ६०० टनाच्या क्रेनने उचलण्यासाठी पुलाला चार बाजूंनी लोखंडी वळाचे दोर बांधण्याचे काम सुरू झाले. ११ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले. ध्वनिक्षेपकावरून ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘बजरंग बली की जय’ अशा घोषणा देऊन हे काम सुरू करण्यात आले.

६५ वर्षीय कर्मचारी अग्रभागी

क्रेनने पुलाचे टप्पे वर उचलल्यानंतर हे टप्पे दोराने ओढणाऱ्या कामगारांमध्ये ६५ वर्षांचा अनुभवी कर्मचारी अग्रभागी होता. हा कर्मचारी सांगेल, त्याच्याशी चर्चा करून अभियंते, क्रेनचालक टप्पा कोठे ओढायचा, कसा ठेवायचा याची माहिती घेत होते. अवजड पूल, अजस्त्र क्रेन आणि त्यात दाढी पिकलेला वृद्ध कर्मचारी उपस्थितांमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला होता.

खर्च आणि कमाई

मे. फकीरचंद रामचरण कंपनीला पूल तोडण्याचे काम देण्यात आले. या कामासाठी रेल्वे, राज्य शासनाला साडेतीन कोटी रुपये खर्च आला. दोन्ही लोखंडी टप्प्यांचे १५० टन वजन आहे. २५ रुपये किलो दराने ठेकेदार भंगार विकणार असल्यामुळे त्याला २७ लाख रुपये मिळतील.

‘पूल धोकादायकच होता’

मुख्य अभियंता अग्रवाल यांनी सांगितले की, २००४ मध्ये नवीन पूल बांधण्यात आला. त्याच वेळी जुना पत्रीपूल तोडून तेथे नवीन उभारण्याचा विचार होता. त्या वेळी पुलाची स्थिती चांगली होती. त्याची देखभाल सुरू ठेवून तो १४ वर्षे सुरू ठेवण्यात आला, हे कमी नाही. अशा परिस्थितीत जुना पत्रीपूल धोकादायक नव्हता किंवा त्याचे गर्डर चांगले होते म्हणून पूल सुस्थितीत होता, असे म्हणणे योग्य नाही.

‘यादों की बारात’चे स्मरण

पत्रीपुलाजवळ काझी यांचा वारसास्थळाचा दर्जा लाभलेला जुना बंगला आहे. त्या बंगल्याजवळ पुलाचा एक भंगाराचा टप्पा ठेवण्यात आला. त्या वेळी उपस्थितीत जुन्याजाणत्यांनी काझी बंगल्यात सत्तरच्या दशकात ‘यादों की बारात’मधील गाण्याचे चित्रीकरण झाले होते, अशी आठवण करून दिली.