कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा १०४ वर्षे जुना नेतिवली येथील धोकादायक उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला मध्य रेल्वेकडून सुरूवात झाली आहे. या कामासाठी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 असा सहा तासांचा जम्बोब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला असून या कालावधीत कल्याण डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नाही. पत्रीपुलाच्या तोडकामासाठी डोंबिवली, ठाकुर्ली येथून कचोरेमार्गे पत्रीपुलावरून कल्याणला जाणाऱ्या वाहनांना सोमवार सकाळपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रीपूलाचे पाडकाम बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजूकडील पूलावर झाली आहे.

(फोटो – दिपक जोशी)

कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने रविवारी दिवसभर बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. यात हा पूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती. घटनास्थळी अग्निशमन विभाग तैनात ठेवण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीत बाजूच्या उड्डाणपुलावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पत्रीपुलाच्या दिशेने जाणाऱ्या लहान रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. डोंबिवलीतील वाहने ९० फुटी रस्त्याने पत्रीपुलावर जातात. ही वाहने नवीन पुलावर जात असताना शीळफाटय़ाकडून येणाऱ्या वाहनांना अडसर ठरतात. ही कोंडी टाळण्यासाठी रविवारी ९० फुटी (कचोरे) मार्गाने पत्रीपुलाच्या दिशेने होणारी वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना वाहतूक विभागाने काढली आहे. ही वाहने ठाकुर्ली म्हसोबा चौकातून खंबाळपाडा, मंगलमूर्ती संकुल, टाटा रस्ता मार्ग शीळफाटा रस्त्याने पत्रीपूल दिशेने सोडण्यात येतील, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

(फोटो- दिपक जोशी)

 

पुलावरचे अवजड गर्डर उचलण्यासाठी मे. फकीरचंद रामशरण कंपनीच्या शक्तिमान पोकलेन आणण्यात आल्या आहेत. पुलाला मध्यभागी काप घेऊन त्याचे दोन तुकडे करण्यात येतील. खूप तोडकाम, कापकाम येथे करण्यात येणार नाही, असे उपस्थित नियंत्रक अधिकाऱ्याने सांगितले. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक विभागाने शनिवारी दुपारपासून पुलाजवळ वाहतूक पोलीस, सेवकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

‘केडीएमटी’च्या जादा बस

कल्याण-डोंबिवलीदरम्यानची रेल्वे सेवा रविवारी बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, कल्याण ते कसारा, कर्जत, डोंबिवली ते ‘सीएसएमटी’ लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली दरम्यान सकाळी साडेसात वाजल्यापासून दर दहा मिनिटांनी बस सोडण्याचा निर्णय केडीएमटीने घेतला आहे. त्यासाठी सर्व वाहक, चालक, अधिकारी, निरीक्षक यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. कल्याण आगार, डोंबिवलीत बाजी प्रभू चौक येथून बस सोडण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांनी जादा भाडे घेऊ नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांची पथके गस्त घालणार आहेत.

पाहा व्हिडीओ –