करोनामुळे व्यवसाय बुडण्याची भिती

अंबरनाथ : करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी रुग्णालयांतील डॉक्टर मोठी लढाई देत असतानाच या क्षेत्रातील दंत विशेषज्ञ आर्थिक कोंडीत सापडले आहेत. अनेक डॉक्टर कर्जबाजारी होण्याची भीती आहे. त्यांना काम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आता या क्षेत्रातील संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील दंतचिकित्सक आणि डॉक्टर या टाळेबंदीमुळे दवाखाने उघडू शकत नाहीत. एका अभ्यासानुसार दंत चिकित्सालयात करोना वाढीची शक्यता ९८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे त्यांना अनेक कठोर सूचना आणि निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. अधिक अडचणींच्या रुग्णांना सेवा दिली जाते. मात्र दवाखाने बंद असल्याने या क्षेत्रातील डॉक्टर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या क्षेत्रात नव्याने आलेल्या डॉक्टरांनी लाखो रुपयांची अत्याधुनिक यंत्रे खरेदी करत आपले दवाखाने सुरू केले होते. त्यासाठी बँकांचे कर्जही घेतले. मात्र अचानक आलेल्या करोना संकटात दवाखाने बंद ठेवावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होते आहे, अशी माहिती अंबरनाथचे डॉ. अविनाश नारायणकर यांनी दिली आहे. दवाखाने बंद असल्याने उत्पन्न नाही, मात्र दवाखान्याचे भाडे द्यावेच लागते आहे. त्यामुळे डॉक्टरांची आर्थिक स्थिती खालावली असून येत्या काळात परिस्थिती गंभीर होऊ  शकते, असेही त्यांनी सांगितले.

दंत डॉक्टरांना अनेक वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याचे प्रशिक्षण असते. शासन सध्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ न सहभागी करत आहे. दाताच्या डॉक्टरांना वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. त्यामुळे शासनाला उलट कौशल्य विकसित असलेले कर्मचारी मिळतील.

– पराग वाणी, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन, कल्याण शाखा.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रयोग

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात दंत डॉक्टरांना संशयितांच्या चाचण्या आणि तपासणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सामावून घेतले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे आणि पालिकेला कुशल कर्मचारी मिळाले आहेत.