05 March 2021

News Flash

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट

आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवण क्षमता संपली आहे.

आधारवाडी कचराभूमीवर रसायनांची फवारणी करण्यात येत आहे.

भगवान मंडलिक

आधारवाडी कचराभूमीजवळील मैदानात मेट्रो भूमिपूजन समारंभ;  सुगंधी रसायनांची फवारणी

कल्याण-भिवंडी मेट्रो आणि सिडकोच्या आवास योजनेतील घरांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणमध्ये येणार असून, शहरातील लालचौकी भागातील वासुदेव फडके मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावरच आधारवाडी कचराभूमी असून तेथील दुर्गंधीचा त्रास कार्यक्रमासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने जंतूनाशक, दुर्गंधी नाशक आणि सुगंधी फवारणीचे काम सुरू केले आहे.

आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवण क्षमता संपली आहे. तसेच ही कचराभूमी बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु उंबर्डे भागातील कचराभूमी सुरू करण्यात राजकीय अडथळा येत असल्याने आधारवाडीतच शहराचा कचरा टाकण्यात येतो. या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास परिसरात नेहमीच जाणवत असतो. अनेकदा कचराभूमीला आग लागून त्याच्या धुराने संपूर्ण परिसर काळवंडून जातो. अशा परिसरातच पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी भाजप नेत्यांनी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली जिमखाना मैदानांची चाचपणी केली होती. मात्र तेथे कार्यक्रमांची आधीच नोंदणी झाली होती. मानपाडा येथील प्रीमिअर मैदानाचा विचार झाला होता. पण त्याच्या आजूबाजूला उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे आहे. कल्याणमधील एका महाविद्यालयाचे प्रशस्त मैदान राजकीय व्यासपीठांना दिले जात नाही. त्यामुळे नवीन मैदानांच्या शोधात असलेल्या भाजप नेत्यांचा हिरमोड झाला आहे. अखेर कल्याण डोंबिवलीतील प्रशस्त मैदाने मोकळी नसल्याने पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी आधारवाडी कचराभूमीजवळील वासुदेव फडके मैदानाचा पर्याय निवडण्यात आला. आता या मैदानात कचऱ्याची दुर्गंधी जाणवू नये, यासाठी जंतूनाशके व रसायने यांचा कचऱ्यावर फवारा करण्यात येत आहे.

आधारवाडी कचराभूमीला आग लागू नये म्हणून १२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पाच फवारणी यंत्र क्षेपणभूमीवर आणण्यात आली आहेत. याशिवाय मलनि:सारण प्रक्रिया टाकीतून प्रसंगी तात्काळ पाणी उपलब्ध होईल, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम फडके मैदान येथे असला तरी त्या ठिकाणी कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. आधारवाडी कचराभूमीवरील धूर किंवा दुर्गंधीचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

नरेंद्र पवार, आमदार, कल्याण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:20 am

Web Title: deodorant crisis on pms program
Next Stories
1 ठाणे जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा
2 बौद्ध स्तुपाचा विकास
3 पालिकेकडून कचऱ्याचे ‘एकीकरण’
Just Now!
X