दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यांत डोंगरांवर वणवे लागण्याचा ‘हंगाम’ सुरू होतो. अगदी एप्रिल अखेपर्यंत हे वणवे जंगल भाजून काढून वनसंपत्तीची राखरांगोळी करतात. हे वणवे जंगलातील दोन गारा (संगमरवरासारखा चकचकीत दगड) एकमेकांवर अचानक घासून निर्माण होतात, असेही नाही. दोन फांद्या एकमेकांवर घासून विस्तव निर्माण करण्याचा जमाना निघून गेला आहे. मग हे वणवे लागतात कसे आणि लावतोय कोण याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. या वणव्यांनी निसर्गातील एक साखळी पूर्णपणे नष्ट करण्याचे काम सुरूकेले आहे. याचे भान स्थानिक वनविभागाचे वनरक्षक अधिकारी आणि वेळोवेळी ‘झाडे लावू, झाडे जगवू’च्या घोषणा करणाऱ्या राज्याच्या वनविभागालाही नाही. हे भान असते तर पिढय़ान्पिढय़ा डोंगरांना लागणारे वणवे लागण्याचे प्रमाण कधीच कमी झाले असते..

डोंगरांवर मार्च ते जून दरम्यान वणव्यांमुळे डोंगरांवर ज्या काळ्याकुट्ट रांगोळ्या दिसतात त्या प्राणी, पक्ष्यांचा निवारा हिरावून घेतात. जनावरांचा चारा नष्ट करतात. वनजमिनीवरील झाडे स्थानिक गावोगावच्या ग्रामस्थांनी कधीच नष्ट केली आहेत. त्यामुळे आहे त्या वनजमिनीवरील दगड, गोटे, मातीचे रक्षण करणे एवढेच काम फक्त वनविभागाच्या हाती राहिले आहे. या सगळ्या निष्क्रिय कारभारामुळे राज्य सरकारला वणवे रोखण्याचे आदेश वनविभागाला द्यावे लागले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील वणव्यांचा विचार येथे प्राधान्याने करावासा वाटतो. ऑक्टोबपर्यंत शेतामधील भातपीक तयार होतात. खळ्यावर टाकलेल्या भातपीकांची झोडणी झाली की, शेतकरी वर्ग पुन्हा शेतीची मशागत करण्याच्या मागे लागतो. डोंगर, माळरानावरचे गवत वाळायला लागते. शेतकरी हे गवत शेतीमधील राबांची भाजणी करण्यासाठी वापरतो. ही भाजणी सुरू असताना अनेक वेळा शेतकऱ्यांच्या नकळत शेतीमधील पेटवलेल्या राबातील आग आजूबाजूच्या माळरानावर, डोंगरावर पसरत जाऊन वणवे लागण्याचे प्रकार घडतात. एकदा आग पसरली की शेतकरी घरी आणि आग डोंगर जाळत राहते. हीच आग मग वणव्याचे रूप धारण करून डोंगर भाजून काढते. डोंगर, झाडे जळून खाक झाले की पुन्हा हाच शेतकरी सरकार, शासनाच्या नावाने खडे फोडत वणव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार, वनमंत्री, वनाधिकारी काहीच करीत नाहीत, अशी बोंब ठोकतो. आपल्या एका चुकीमुळे जंगलाला आग लागली आहे, याचे साधेसे भान या शेतकऱ्याला राहत नाही. अशारीतीने गावोगावचे अनेक शेतकरी वणवे लावण्यामागचे मुख्य आरोपी आहेत.
शिकारीसाठी आगी
वणवे लावण्यामधील दुसरे आरोपी शिकारी आहेत. डोंगर, पठारावर राहणारा वाडय़ा, पाडय़ांमधील आदिवासी समाजातील रहिवासी फेब्रुवारीपर्यंत शेतीची कामे आटोपतो. मग उर्वरित काळात रहिवासी मिळेल तेथे मजुरी करतो वा शिकारीच्या मागे लागतो. शिकार हा त्यांचा पिढय़ान्पिढय़ाचा व्यवसाय आहे. पावसाळ्याचे चार महिने शिकारीला वाव नसल्याने, हा रहिवासी फेब्रुवारी, मार्चपासून डोंगर-दऱ्यांमध्ये शिकारीसाठी फिरण्यास सुरुवात करतो. पावसाळच्या चार महिन्यांत जंगलातील गवत, झाडेझुडपे तर्रारून वर आल्याने शिकाऱ्यांना आपल्या लक्ष्याचा शोध घेण्यात मोठी अडचण निर्माण होते. जंगलातील ससे, मोर, तरस, भेकर, रानडुक्कर हे प्राणी, लावऱ्या (चिमणीसारखा पक्षी) व लहान-मोठे पक्षी या शिकाऱ्यांचे लक्ष्य असते. माजलेले गवत आणि झुडपांमुळे प्राणी शिकारींच्या तावडीत सापडत नाहीत. ते या झुडपांमध्ये दडून बसतात. नंतर आहे त्या ठिकाणाहून पळ काढतात. काही जंगली प्राणी या तांडय़ांच्या तडाख्यात सापडून शिकार बनतात. जंगली प्राण्याचे एकदा मांस आणि त्याचे रक्त प्यायले की वर्षभर एक प्रकारचा तजेला असतो, असा एक समज या डोंगरी, पठारी भागांत राहणाऱ्या रहिवाशांचा असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जंगली प्राणी पकडायचाच, असा एक पण या मंडळींनी केलेला असतो आणि त्या ध्यासापायी ही मंडळी जंगलच्या जंगल पायदळी तुडवून काढतात आणि जंगली प्राण्यांना लक्ष्य करतात. प्राण्यांना शोधण्यासाठी शिकारी मंडळी डोंगरांवरील वाळलेल्या गवतांना आगी लावण्याचे उद्योग सुरू करतो. त्यातून जंगलच्या जंगले आगीत राख होतात.
प्राण्यांचा अधिवास नष्ट
यापूर्वी शेतकरी भातशेतीला राब तयार करण्यासाठी जंगलातील वाळलेले गवत, झाडांचा वाळलेला पाला यांचा वापर करीत असे. आता मजूर माणसे मिळत नाहीत. भातशेती करणे महाग झाले आहे. कष्टाची कामे करण्यास कोणी पुढाकार घेत नाही. गावोगावची गाईगुरे वळण्यास गुराखी नसल्याने शेतकऱ्यांनी गुरांचा गोठा हा प्रकार बंद करून टाकला आहे. त्यामुळे जंगल, माळरानावरचे गवत खाण्यास जनावरे शिल्लक नाहीत. त्यामुळे जूनच्या पहिल्या पावसापासून वाढणाऱ्या गवताला जनावरांचे तोंड लागले नसल्याने ते गवत तर्रारून वाढलेले असते. पाच ते सहा फूट उंच वाढलेले हे गवत शेतकरी शेतात राबाला जाळण्यासाठी नेणे बंद झाला आहे.
त्यामुळे जंगलांना आग लावली की कोळून वाळलेले गवत इंधनासारखे पेट घेते. या गवताला झाडांच्या पालापाचोळ्याचा आधार मिळतो. त्यामुळे ३० ते ४० फूट उंचीपर्यंत वणव्याचे लोळ जंगली झाडेझुडपे जाळून काढतात. एकदा आग लागली ती मैलोन्मैल पसरत जाते. जंगलाला आग लागली की ती विझवायला जाणार कोण, असाही प्रश्न वनविभागाचे हे काम आहे, मात्र वणवे रोखण्यात त्यांना पूर्ण अपयश आले आहे.
जंगलांना आगी लागल्यानंतर डोंगरांच्या कपारी, गुहा, उंच झाडांचे आडोसे, खोबणीमध्ये अधिवास करून असलेले प्राणी, पक्षी जीव वाचविण्यासाठी जंगलांमध्ये सैरावैरा पळत सुटतात. हे पळणारे प्राणी, पक्षी टपून बसलेले शिकारी हेरतात. जंगले जाळून टाकली की गवत, झुडपे खाक होतात. मग शिकाऱ्यांना प्राणी, पक्षी पकडण्यासाठी मोकळे मैदान जंगलात तयार होते. मार्च, एप्रिल महिन्यांत जंगलांना आगी लावण्याचा छंदच डोंगरी भागात राहणाऱ्या रहिवाशांना लागतो. या मंडळींना पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षणाचा गंध नसतो. जंगली प्राणी हे फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आहेत आणि त्यांना लक्ष्य करणे हा आपला धर्म आहे, या बाण्यातून ही मंडळी जंगले बेचिराख करून प्राण्यांना लक्ष्य करण्याच्या मागे धावतात.
प्राण्यांच्या शिकारी
जंगलांची राखरांगोळी केली की हाच शिकारी पुन्हा वीस ते तीस जणांच्या समूहाने जंगली प्राणी शोधण्यासाठी बाहेर पडतो. जंगले खाक झाल्याने लपण्यासाठी झुडुप, गवतांचा आडोसा नसतो. कोठे तरी झाडाचा, डोंगर ओहोळीचा आधार घेऊन हे प्राणी भीतभयाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असतात. शिकारी मंडळी दिवसभर जंगली प्राणी हेरून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मार्गात जाळी लावून त्यांना पकडायचे (खोड काढणे) असा कार्यक्रम आखतात. वीस ते चाळीस जण एकाच वेळी ससे, तरस, भेकरे, मोर, डुक्कर यांच्या कळपांमागे लागत असल्याने दमछाक झाल्यानंतर हे प्राणी शिकाऱ्यांच्या तावडीत, जाळ्यात अडकतात. घरात चूल पेटविण्यासाठी दररोज लाकूड फाटा लागतो. हा सगळा लाकूडफाटा वणव्यांमुळे जळून खाक जंगलातून स्थानिक ग्रामस्थ, वाडीवरील रहिवाशांना मिळतो. त्यामुळे जंगलांना लागलेला वणवा हा खेडेगाव, वाडीवरील रहिवाशांना लाकूडफाटा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा हातभार लागतो.
वनविभागाची निष्क्रियता
शिकारी मंडळींना रोखणे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु आता वनविभागातील वनरक्षक, वनसेवक, फॉरेस्टर, रेंजर यांना ‘शोधा आणि बक्षिसे’ मिळवा, अशी वेळ काही दिवसांनी शासनावर येणार आहे. आता वनविभागाचा कर्मचारी फक्त कोठे तपासणी नाका असेल तेथेच दिसतो. वनविभागाचे कार्यालय आणि घर एवढेच वन कर्मचाऱ्याचे परिघ क्षेत्र आहे. जंगलपट्टीत कधी कोणी वन कर्मचारी जंगलाचे रक्षण, शिकाऱ्यांचा बंदोबस्त करताना आढळत नाही. सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली गावाजवळचे डोंगर वन कर्मचाऱ्यांनी वनराईने फुलविले होते. पण हीच जंगले वनसेवकांच्या समोरून आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तोडून साफ केली आहेत. इतका आंधळा आणि वेंधळेपणा या खात्यात आहे.
ठाण्याच्या वनविभागातील उपवनसंरक्षकांना कधी भ्रमणध्वनी केला तर अख्खे जंगल जगविण्याची जबाबदारी फक्त त्यांचीच आणि त्यातच गुंग आहेत, अशा थाटात ते कधी भ्रमणध्वनीला प्रतिसाद देत नाहीत. अशा प्रकारची वनविभागाची सुस्त यंत्रणा असेल तर वणव्यांनी वने नष्ट होत असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वणवे लावून जंगले जाळल्यानंतर रात्री आठ ते पहाटेपर्यंत प्रखर झोताच्या विजेऱ्या वापरून शिकारी जंगले पालथी घालतात. असे निशाचर शिकारी सर्वसामान्यांना दिसतात, मग ते वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत, असे कसे म्हणता येईल? जंगलांना आगी कोण लावतेय, त्यांच्या वस्त्या कोठे असतात, त्यांच्यावर पाळत ठेवली तर आपण कायद्याने काय कारवाई करू शकतो, याची पूर्ण जाणीव वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना आहे. गवत आणि झाडेझुडपे जळली तर बिघडले कोठे आणि आपली घरे चांगली भरभक्कम सजली आणि भरली आहेत ना, असे एक पक्के गणित या विभागातील कर्मचाऱ्यांचे असते. या विभागातील वरपासून ते खालपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे हे सूत्र आणि त्यांची निष्क्रियता जंगलांची राखरांगोळी करण्यास कारणीभूत ठरत आहे.