पाण्यापासून वंचित नागरिकांनी जलवाहिनी फोडली

प्रसेनजित इंगळे, विरार

नालासोपारा शहरात पालिकेची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून जलवाहिनी तोडून केली जाणारी पाणी चोरी पालिकेची डोकेदुखी ठरली आहे.

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणी असले तरी शहराच्या अनेक भागांत नळजोडण्या नसल्याने तेथे पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागातील लोकांना आता पाण्याची चोरी करावी लागत आहे. नालासोपारा पूर्व परिसरात आजही केवळ हंडाभर पाण्यासाठी लोकांना पाण्याची चोरी करावी लागत आहे. नालासोपारा पूर्वीच्या संतोषभुवन, डहाणू बाग, वाकण पाडा, श्रीराम नगर, बिलालपाडा गावराई पाडा पेल्हार या परिसरात पालिकेचे पाणी आलेले नाही. यांमुळे लोकांना या विभागात एक तर पाणी विकत घ्यावे लागते अथवा पाण्यासाठी जलवाहिनी फोडून पाणी चोरी करावी लागत आहे. बिलाल पाडा येथे जलवाहिनीचा वाल तोडून लोक पाणी भरत आहेत तर श्रीराम नगर येथे लोकांनी जलवाहिनीच्या वॉल जवळच सिमेंटचे बांधकाम करून पाइप लाइन टाकली आहे. येथून पिण्यासाठी पाणी तर भरले जातेच, शिवाय कपडे आणि गाडय़ाही धुतल्या जात आहेत.

असे कोणते प्रकार आढळल्यास आम्ही तातडीने कारवाई करतो, पण या विभागात लोक वारंवार जलवाहिनी फोडत असल्या आम्ही तातडीने कारवाई करू.

– माधव जवादे, शहर अभियंता,