|| प्रसेनजीत इंगळे

पत्र्याच्या शेडमधून कारभार; शौचालय, पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही

विरार :  वसई रेल्वे पोलीस ठाण्याची दुरवस्था झाली असून येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मूलभुत सोयीसुविधा नसल्याने मोठय़ा गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांना बसण्यासाठी पत्र्याची शेड असून नैसर्गिक विधीसाठी शौचालयाचीही सोय नाही. यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी कुचंबणा होत आहे.

वसई रेल्वे पोलिसांच्या आदिपत्याखाली मीरारोड ते वैतरणा असी ७ रेल्वे स्थानके येतात. वसई रेल्वे स्थानकाजवळ मुख्य पोलीस कार्यालय आहे. मात्र या रेल्वे ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मूलभुत सोयीसुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात मागील २० वर्षांत  साध्या पोलीस चौकी बांधण्यात आल्या नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत.

यात मीरा रोड, वसई, भाईंदर, नालासोपारा, आणि विरार ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांना सतत पाळत ठेवावी लागत आहेत. यासाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी काम पाहत आहेत यात ३४ महिला कर्मचारी आहेत. केवळ भाईंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहेत.

बाकी इतर स्थानकात चक्क पत्राच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, जेवतात, तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. याठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांचे शौचालये  वापरावे लागतात. त्यातही त्यांना रांगेत उभे राहावे लागते. याहून दयनीय अवस्था महिला कर्मचाऱ्यांची आहे.

त्यांना गणेश परिधान करण्यासाठी कोणतही चेंजिंग रूम नाहीत, शौचालये नाहीत, पिण्याचे पाणी नाही. शौचालये नसल्याने आम्ही दिवसभर पाणीच पीत नसल्याचे त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.   रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचार्यांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेऱ्या माराव्या लागत, अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशा वेळी चौकी नसल्याने रेल्वे  स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना वसई रेल्वे पोलीस वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले की,  या संदर्भात आम्ही रेल्वेशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणतीही दखल रेल्वेने घेतली नाही. लवकरच या संदर्भात चर्चा होऊन यावर काही तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.