‘आरटीओ’ च्या अचानक कारवाईने रिक्षाचालकांची पळापळ; दीडशे नियमबाह्य़ रिक्षा मिळेपर्यंत मोहीम सुरू ठेवणार
डोंबिवलीत दीडशेहून अधिक भंगार रिक्षा चालविण्यात येत आहेत. या रिक्षांची सोळा वर्षांची मुदत संपूनही हे रिक्षाचालक बिनधास्तपणे डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील मुख्य रस्त्यांवर रिक्षा चालवीत असल्याची गोपनीय माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आर. टी. ओ.) उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांना मिळाली होती. दीडशे रिक्षाचालकांच्या वाहन क्रमांकासह माहिती मिळाल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अचानक डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील रिक्षांची तपासणी मोहीम सुरू केली.
डोंबिवली पूर्वेतील रिक्षा संघटनेच्या एका नेत्याच्या २५ भंगार रिक्षा पूर्व भागात प्रवासी वाहतूक करीत असल्याची धक्कादायक माहिती यानिमित्ताने उघड झाली आहे. एका लोकप्रतिनिधीचा या नेत्याला आशीर्वाद असल्याने या नेत्याविषयी कोणीही काही बोलण्यास तयार नसल्याचे समजते. या नेत्याच्या भंगार रिक्षावर परिवहन विभाग कोणती कारवाई करतो याकडे रिक्षा चालकांसह अन्य मंडळींचे लक्ष लागले आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता आणि मोठागाव रेतीबंदर रस्त्यावर धावणाऱ्या दीडशेहून अधिक रिक्षा या भंगार आहेत. या रिक्षावापराची सोळा वर्षांची मुदत संपली आहे. तरीही रिक्षा वाहन क्रमांकात हेराफेरी करून चालविण्यात येत आहेत. एका जागरूक रहिवाशाने दोन महिने मेहनत घेऊन भंगार रिक्षा कोणत्या रस्त्यावर कधी धावतात, त्यांचे वाहन क्रमांक याची माहिती मिळवली. या रिक्षा भंगार आहेत याची खात्री करून घेतली. अशा दीडशेहून अधिक भंगार रिक्षांची यादी तयार झाल्यानंतर या नागरिकाने ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्याकडे सुपूर्द केली. ही यादी मिळाल्यानंतर कल्याण आरटीओचे प्रमुख नाईक यांनी रिक्षांचे वाहन क्रमांक, त्यांचे मालक आणि या रिक्षांचे आयुर्मान याची कार्यालयातील दस्तऐवजावरून खात्री केली. अनेक रिक्षा बेकायदा सुरू असल्याची खात्री पटल्यावर आरटीओ नंदकिशोर नाईक यांच्यासह मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर, प्रशांत शंदे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात या रिक्षा जप्त करण्याची कारवाई सुरू केली. जप्त केलेल्या रिक्षा थेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. अचानक रिक्षा जप्त झाल्याने काही चालकांनी आपल्या आश्रयदाते असलेल्या नेत्यांसोबत संपर्क साधला. ‘आरटीओ’ची नियमानुसार कारवाई सुरू असल्यामुळे या नेत्यांनी रिक्षेची कागदपत्रे घेऊन यावे, असे सांगून अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाई हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षांची नियमित तपासणी करण्यात येतेच. पण काही चालक रात्री, पहाटे, तर काही दिवसभर मुदत संपलेल्या रिक्षांमधून प्रवासी करीत असल्याची खात्रीलायक तक्रार प्राप्त झाली होती. येत्या पंधरा दिवसात शाळा सुरू झाल्यानंतर अनेक चालक मुलांची शाळेत वाहतूक करतात.अशा वेळी कोणताही धोका उद्भवू नये म्हणून नियमबाह्य़ रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई हाती घेण्यात आली आहे.
नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण</strong>