बदलापूर नगरपालिकेमध्ये नियोजनाचा अभाव; निधी परत जाण्याची भीती

गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकरांना प्रतीक्षा असलेल्या नाटय़गृहाचे स्वप्न पूर्ण होण्यास आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या संथ कारभारामुळे वर्षभरापासून निधी असूनही विकास आराखडय़ातील आरक्षण मंजूर असतानाही केवळ भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नाटय़गृह रखडल्याचे समोर येत आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या बदलापूर शहरात एक सुसज्ज नाटय़गृहाच्या मागणीवर लक्ष देत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून १४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यास मंजुरी दिली. या निधीच्या वापरासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांची समितीची स्थापना झाली. त्यांना कामाची अंमलबजावणी, वेळेत आणि गुणवत्तेनुसार पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा बदलण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सविस्तर अंदाजपत्रक आणि सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करणार आहेत. म्हणजेच निधीच्या विनियोगाचा अधिकारही समितीला आहे.

महाराष्ट्रातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत बदलापूरच्या नाटय़गृहासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. मात्र त्याचा विनियोग करणे महत्त्वाचे आहे. या निधीतून नाटय़गृहासह पार्किंग, उद्यान तसेच पालिकेला स्वत:ची शासकीय इमारत बांधण्याचीही संधी आहे. नाटय़गृह आणि प्रशासकीय इमारतीसाठी मिळालेला हा १४ कोटी रुपयांचा निधी वर्षभरात वापरणे गरजेचे आहे. मात्र तो लवकरात लवकर वापरला नाही तर परत जाण्याची भीती नगरसेवक संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालिकेने महिनाभरात कार्यवाही सुरू न केल्यास उपोषणाचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही.