‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’च्या व्यासपीठावरून आवाज

वसई : कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बसिन अमन कमिटीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. खलिल शेख यांनी वसई-विरारमध्ये शहर नियोजन या संकल्पनेचाच सत्यानाश झाला असल्याचे विविध उदाहरणांवरून दाखवून दिले. वसई-विरार परिसरात रेल्वेस्थानकांलगत बांधण्यात आलेल्या आकाशमार्गिका या ठिकाणच्या जनतेकरिता ‘ऐतिहासिक देणगी’ आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. आकाशमार्गिकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्याऐवजी उलट या आकाशमार्गिका वाहतूक कोंडीत भर घालू लागल्या आहेत. एक टक्के जनताही या मार्गिकांचा वापर करत नाही. त्यामुळे या मार्गिका लोकांच्या सोयीसाठी नसून कोणाच्या तरी फायद्यासाठी बांधण्यात आल्या आहेत, अशी स्पष्टोक्तीही अ‍ॅड. खलिल यांनी केली. ‘हात दाखवा, एस.टी. थांबवा’ हे एस.टी. महामंडळाचे घोषवाक्य आता रिक्षाचालक, स्कूल बस, पाण्याचे टँकर यांनी अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. रिक्षा कुठेही थांबतात, स्कूल बसेसचेही ताळतंत्र सुटले आहे. पाण्याचे आणि मोठय़ा मालाच्या टँकरचालकांना आपण वाहन कुठे उभे करतो, याचे भानही राहिलेले नाही. यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. यावर महापालिका, वाहतूक पोलीस यांनी नियंत्रण ठेवायला हवे. पण तसे होताना दिसत नाही. पालिकेला आपण याबाबत अनेकवेळा निवेदने दिली, पण कार्यवाही होत नाही, अशी खंतही अ‍ॅड. खलिल यांनी व्यक्त केली.

लायन प्रशांत पाटील यांनी शहर नियोजनाच्या अभावाचा मुद्दा प्रकर्षांने मांडतानाच वाहतूक कोंडीची कारणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेल्या पदपथांच्या मुद्दय़ावर सविस्तर विवेचन केले. लहानपणी आम्ही बैलगाडीतून प्रवास केला, त्यानंतर सायकलवरून प्रवास झाला. त्यानंतर बाईकवरूनही भटकंती केली. आता चारचाकी आली आहे. पण शहरात पावलोपावली होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चारचाकीचा प्रवास जीव गुदमरून टाकत आहे. मोठय़ा दुकानांमध्ये माल घेऊन येणारी अवजड वाहने कुठेही उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली की त्यातून माल उतरेपर्यंत ही कोंडी कायम राहते. तोपर्यंत लोकांना ताटकळावे लागते. यावर वाहतूक पोलिसांचे लक्ष हवे, असे पाटील म्हणाले.

याशिवाय शाळा बस कुठेही थांबवल्या जातात. रिक्षा, स्कूलबस, अवजड वाहने यांना विशिष्ट ठिकाणी थांबे द्यायला हवेत. जेणे करून वाहतूक कोंडीच्या समस्येतून थोडी का होईना, पण जनतेची सुटका होईल. फेरीवाल्यांना ‘हॉकर्स झोन’ देणेही गरजेचे आहे. अन्यथा पालिका कारवाई करते, तोपर्यंत फेरीवाले पळ काढतात. पालिकेची यंत्रणा निघून गेली की पुन्हा फेरीवाले पदपथ व्यापून टाकतात. हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. हा लुटुपुटुचा खेळ ताबडतोब थांबवून पालिकेने फेरीवाल्यांना हॉकर्स झोन बहाल करावेत, असेही पाटील म्हणाले.

‘निर्भय’चे मनवेल तुस्कानो यांनी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या स्टेशनलगतच्या परिसरातील कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या आकाशमार्गिका एमएमआरडीएचे पाप असल्याचा घणाघात केला. पूर्वी गावातून निघालेली एस.टी. प्रवाशांना थेट स्टेशनपर्यंत पोहोचवत असे. आता आकाशमार्गिकांमुळे एस.टी. स्टेशनपर्यंत पोहचू शकत नाही. हा एस.टी.ला संपवण्याच्या कटाचा एक भाग आहे की काय अशी शंका निर्माण होते, असेही तुस्कानो म्हणाले. विरारला आकाशमार्गिका कशाप्रकारे मार्किंग करून बांधल्या याचा शोध घेतला तर वेगळेच वास्तव बाहेर येईल, असेही तुस्कानो म्हणाले. अनिर्बंध नागरीकरणामुळे वसई-विरारची गर्दी वाढली असून असे करण्यात कोणाचे हित आहे, हे सर्वानाच माहीत आहे, असेही तुस्कानो म्हणाले. वाहतूक कोंडीमुळे निर्माण होत असलेल्या प्रदूषणाच्या जीवघेण्या समस्येकडेही त्यांनी सर्वाचे लक्ष वेधले. पूर्वी फुप्फुसाशी संबंधित विकार असलेला एखादाच रुग्ण डॉक्टरांकडे जात असे. आता दिवसाला दहा-बारा रुग्ण हे श्वसनविकाराशी संबंधित असल्याची माहिती आपल्या परिचयातील एका नामांकित डॉक्टरांनी दिल्याचेही तुस्कानो म्हणाले.

विलास चोरघे यांनी अनधिकृत रिक्षा कायमच्या बंद करण्याची मागणी पुढे केली. शिवाय बेभान होऊन सुसाट वेगाने आणि वेडय़ावाकडय़ा मार्गाने चालणाऱ्या दुचाकींचा मुद्दाही त्यांनी पुढे आणला. ते म्हणाले, ‘आज वसई-विरारमध्ये साडेचार ते पाच हजार अनधिकृत रिक्षा आहेत. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होत आहे. त्यात दुचाकीस्वारांचेही ताळतंत्र सुटले आहे. अशावेळी प्रशासनाला कठोर व्हावे लागेल.’ सिग्नलच्या वेळेतील गोमही त्यांनी निदर्शनास आणून दिली. अनेक ठिकाणी जिथे वाहतूक जास्त असते तिथे सिग्नलचा अवधी खूप कमी असतो. मात्र, जिथे गर्दी नसते, त्याठिकाणी जास्त वेळ सिग्नल ठेवून वाहनचालकांना ताटकळत ठेवले जात आहे, असे सांगत सिग्नलची वेळ सर्व ठिकाणी एकसमान ठेवण्याची सूचना चोरघे यांनी यावेळी केली. अनधिकृत फेरीवाल्यांबरोबरच शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बाजार भरवले जातात. त्यामुळेही कोंडी होत असून यावर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे, असेही चोरघे म्हणाले.

डॉ. दिनेश कांबळे यांनी फेरीवाल्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे सुचविले. वाहतुकीच्या  कोंडीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देतानाच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. एनएसएस अथवा तत्सम विद्यर्थ्यांंच्या माध्यमातून ट्रॅफिक किंवा त्याच्याशी संबंधित अन्य समस्यांबाबतचा डाटा जमा करून त्यानुसार उपाययोजना आखण्याची सूचनाही त्यांनी केली. वाहतुकीचे नियम जे मोडतात त्यांनाच ‘वाहतूक दूत’ बनवण्याचा अनेक ठिकाणी यशस्वी झालेला उपक्रम वसई-विरारमध्ये राबवण्याची सूचनाही त्यांनी केली. वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांच्या बाबतीत

पालिका किंवा पोलिसांची कारवाई ही प्रबोधन आणि नियम तोडण्यापासून नागरिक परावृत्त होतील, अशी स्वरूपाची हवी, असेही ते म्हणाले.

यानंतर उपस्थितांपैकी नारायण पिंपळे, जॉन परेरा, नितीन राऊत, अमर कोल्हेकर, शोभा लिंगायत, हर्षद प्रभू, ज्योती कुडू, नितीन मोरे, दिनू काका, दिनेश दिवाण, हेमंत माटवणकर, वसंत किणी इत्यादींनी सर्वसामान्यांना दैनंदिन स्वरूपात वाहतूक आणि फेरीवाल्यांशी संबंधित भेडसवणाऱ्या समस्या मांडल्या. यामध्ये रिक्षांमधील ओव्हरसीट, नियोजनशून्य आणि अनिर्बंध नागरीकरण, पालिकेकडून होत असलेले रस्त्यांचे खोदकाम, स्कूल बसेसचा फिटनेस, शाळांपासून १०० मीटरच्या अंतरावरील पानटपऱ्या, वाहतूक पोलिसांची चिरीमिरी, चुकीची सिग्नल यंत्रणा, अल्पवयीन मुलांचे गाडय़ा चालवणे, रस्त्यांवरील भंगार अवस्थेतील टाकून दिलेली वाहने इत्यादींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी केले. त्यांनी ‘लाऊडस्पीकर’ची संकल्पना उपस्थितांसमोर विशद केली. ‘कोणताही प्रश्न एका कार्यक्रमाने सुटेल, असे समजू नका, पण किमान प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल हे निश्चित. जनतेच्या समस्यांना वाचा फोडताना जनता आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधायचा आहे. त्यासाठीच ‘लाऊडस्पीकर’चे आयोजन आहे’, असे खांडेकर म्हणाले. आभार प्रदर्शन लोकसत्ताच्या विविध पुरवण्यांचे समन्वयक आसिफ बागवान यांनी केले. कुणाल रेगे यांचे सूत्रसंचालन समयसूचक आणि गंभीर विषयावरही सभागृहातील वातावरण हलकेफुलके ठेवणारे ठरले.

नागरिकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक, दुचाकीस्वार किंवा रस्त्यामध्येच गाडय़ा पार्क करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे यांच्यावर पोलीस वेळोवेळी कारवाई करतात. मात्र, आम्हाला जनतेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, याकडे विरारचे वाहतूक पोलीस हवालदार राजू गायकवाड यांनी लक्ष वेधले. वाहतूक कोंडीची समस्या निश्चित गंभीर आहे. पण पार्किंगसाठी शहरात जागाच नाही. वाहनचालक रस्त्याच्या कुठेही म्हणजे उजवीकडे-डावीकडे गाडय़ा पार्क करतात. यासाठी सम आणि विषम तारखेला रस्त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे गाडय़ा पार्क करण्यास अनुमती देता येईल का, याचा विचार व्हायला हवा. अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये गाडय़ा उभ्या असतात. पोलिसांकडे बळ आणि साधनसामग्री कमी आहे. महापालिकेने आम्हाला टोईंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर आम्ही गाडय़ा उचलू. बऱ्याच वेळेला लोकांनाच घाई असते. त्यामुळे अनेक जण वाहतुकीचे नियम मोडून कशीही गाडी काढण्याचा प्रयत्न करतात आणि ट्रॅफिकमध्ये फसले की परत ट्रॅफिक जॅमच्या नावाने बोंबा मारतात. नियम तोडणारेच जेव्हा ट्रॅफिक का झाली, असा प्रश्न आम्हाला विचारतात तेव्हा आश्चर्य वाटते. ओव्हरसीटमध्ये न बसण्याचा निर्धार जनतेने केला तर कोणताही रिक्षाचालक ओव्हरसीट रिक्षा चालवणारच नाही. पण लोकांनाच घाई असते. नंतर सर्व दोष पोलीस यंत्रणेवर टाकला जातो, असेही पोलीस हवालदार गायकवाड म्हणाले. अल्पवयीन मुलांच्या गाडी चालवण्याचा मुद्दाही गायकवाड यांनी उपस्थित केला. याबाबत पालकांनी आपले मूल १८ वर्षांचे होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात गाडीची चावी देणार नाही, असा निर्धार करावयास हवा.

फेरीवाल्यांकरिता ‘हॉकर्स झोन’ 

वसई-विरार शहर महापालिकेशी संबंधित प्रश्नांना प्रभारी साहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवीस तसेच दिनेश चव्हाण यांनी उत्तरे दिली. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका कारवाई करते. मात्र संध्याकाळी कार्यालय बंद झाले किंवा आम्ही घरी निघून गेलो की, फेरीवाले पुन्हा पदपथ व्यापून टाकतात. फेरीवाल्यांकरिता ‘हॉकर्स झोन’ घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. नागरिकांनीही बाजारात जाऊनच खरेदी करावी. रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून काही खरेदी न करण्याचे ठरवल्यास फेरीवाल्यांची संख्या वाढणार नाही. रस्त्यात महापालिका पाईपलाईन किंवा इतर कामासाठी खड्डे खणते. पण काम झाल्यानंर खड्डे बुजवते. त्यानंतर अन्य यंत्रणा त्यांच्या कामासाठी खड्डे खणतात. त्याचे खापर मात्र महापालिकेवर फोडले जाते, असेही चव्हाण आणि गोन्सालवीस द्वयींनी सांगितले. मात्र, विरार पूर्वेकडील चंदनसार येथील मुख्य रस्त्यावरील खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून जसाच्या तसा आहे. त्यात अनेक अपघात झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही तो का बुजवला जात नाही, या प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नावर हे दोघेही निरुत्तर झाले.

शाळा बस संदर्भात शासनाची नियमावली आहे.  या सर्व नियमांचे पालन करणाऱ्या स्कूलबसेसचीच नोंदणी होते. स्कूलबसना रस्ता करातून सूट दिलेली आहे. हे पैसे त्यांनी शासन नियमानुसार स्कूलबसची संरचना करण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. स्कूल बस परिपूर्ण असाव्यात यासाठी आम्ही शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच सर्व शाळांना अवगत करतो.  स्कूलबसची तपासणी करतो. मात्र, पालकांनीही बसमध्ये काही उणिवा असल्यास त्या आमच्या निदर्शनास आणाव्यात. त्यानुसार निश्चित कारवाई केली जाईल. माझा मुलगा सर्व सुविधांनी युक्त सुरक्षित स्कूलबसमधूनच शाळेत जाईल, असा निर्धार पालिकांनीही करायला हवा. याशिवाय आता भंगार वाहनांच्या बाबतीत मोटर वाहन कायद्यामध्ये सुधारणा होत आहे. कोणतेही वाहन विशिष्ट कालावधीनंतर कार्बन जास्त प्रमाणात उत्सर्जित करत असल्यामुळे प्रदूषण बळावते. यासाठी जुने वाहन भंगारात काढणाऱ्यांना नवीन वाहन खरेदीत काही सवलत देण्याचे धोरण शासनाकडून अवलंबले जाणार आहे. विविध रस्त्यांवर दिसणाऱ्या बेवारस वाहनांवर पालिकेला देखील कारवाई करता येते. पालिकेने पोलिसांना माहिती दिली तर अशी वाहने जप्त करून त्यांच्या लिलावाची कारवाई करता येते. शिवाय पुढे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणाऱ्या पालकांना दंड ठोठावण्याची सुधारणा कायद्यात होत आहे.’

– अनिल पाटील ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

‘पोलीस क्षमतेपेक्षा जादा आसने (ओव्हरसीट) घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करत नाहीत, असे मुळीच नाही. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात आम्ही विरारमध्ये १५७ तर वसई विभागात १३५ रिक्षाचालकांवर कारवाई करून जवळपास ९६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. नियमांचे उल्लंघन करून स्कूल बस चालविणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना अनेक वेळा मर्यादा येतात. पोलीस बळ कमी पडते. माझ्याकडे आज घडीस केवळ ७० पोलीस आहेत. त्यातील काही सुट्टय़ांवर असतात, काही बंदोबस्तावर असतात. त्यामुळे कारवाई करताना मर्यादा येतात. आता आपल्या भागात पोलीस आयुक्तालय येत आहे. त्यामुळे अधिक पोलीस बळ मिळेल. त्यावेळी आमच्या कारवाईला निश्चितच वेग येईल. ज्या-ज्या ठिकाणी वाहतुकीची समस्या बिकट असल्याचे आता यावेळी सांगण्यात आले आहे, त्याची आम्ही निश्चितच दखल घेऊन पुढील उपाययोजना करू. अनेकांनी उपयुक्त सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना वरिष्ठांना कळवून त्यावर अंमलबजावणी करू.’  

– राजेंद्र कांबळे, प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक

‘अप्रतिम झाला कार्यक्रम. लोकसत्ता नेहमीच वाचकांसाठी काय तरी चांगलं घेऊन येत असते. वाहतूक कोंडीच्या समस्येवर चर्चा होणे गरजेचे होते. ती लोकसत्तामुळे घडून आली.

 -संतोष वाळके

लोकसत्ताने आयोजित करण्यात आलेला उपक्रम हा अतिशय चांगला होता. या कार्यक्रमामुळे सर्वाना छान प्रश्न मांडता आले. -अक्षय कोलते

लोकसत्ताचा वाहतूक कोंडी व फेरीवाल्यांची समस्या यावरील लाऊडस्पीकर कार्यक्रम अप्रतिम झाला. असेच विविध विषयांवर कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे. -डॉ. हेमंत जोशी (बालरोगतज्ज्ञ)

लोकसत्ता सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा नेहेमीच प्रयत्न करत असते. आणि हा त्यातलाच एक यशस्वी प्रयत्न होता. लोकसत्ताचे खूपखूप आभार. सामान्यांसाठी त्यांनी हा उत्तम उपक्रम राबवला.

– मिलिंद पोंक्षे

वाहतूक कोंडीमुळे कामावर जायला रोज उशीर होतो. यावर तोडगा निघणे गरजेचे होते आणि त्यासाठी लोकसत्तेचा हा प्रयत्न नक्कीच काम करणार आहे. कार्यक्रम खूपच छान झालेला आहे.’-अक्षय कदम