tv13साधारण २००८-०९ मध्ये नवीन घर घेतल्यामुळे आम्ही आमच्या घरी गणपती आणला होता. मुख्यालयातील सर्व स्टाफला निमंत्रण देण्यासाठी मी प्रत्येक टेबलावर जात होतो. त्याच वेळी टीसा हाऊसमध्ये एक छोटे चहाचे कॅण्टिन चालविणारे पेडणेकर चहा घेऊन आले. मी त्यांनाही गणेशोत्सवाचे निमंत्रण दिले. ते घरी आले तेव्हा त्यांच्या मुलांविषयी चौकशी केली. त्या वेळी समजले की त्यांची मुलगी बॉम्बे फार्मसी कॉलेजमध्ये ‘बी.फार्म’चे शिक्षण घेत आहे. पेडणेकरांची आर्थिक परिस्थिती समोरच होती. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर जरूर सांगा, असे मी त्यांना म्हटलं. त्यातूनच मदतीचा सिलसिला सुरू झाला. पेडणेकरांच्या मुलीने, प्रीतीने बी.फार्मनंतर ‘एच.फार्म’ही डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण केले. तिच्या एका पेपर वाचनासाठी तिला अमेरिकेतूनही निमंत्रण आले. नंतर पीएच.डी.साठीही तिला अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रवेश मिळाला. शिष्यवृत्ती मिळाली असल्याने केवळ तिच्या प्रवासाचा खर्च करावा लागला. अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीत असलेल्या कुटुंबातील मुलगी समाजातील दानशूर व्यक्तींमुळे एवढे उच्च शिक्षण घेऊ शकली. याची जाणीव प्रीतीलाही आहे. म्हणूनच, आज घेणारे हात भविष्यात देणारे बनतील, असे तिने वेळोवेळी बोलून दाखवले. ते खरेही केले. प्रीतीप्रमाणेच परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांनी आतापर्यंत नवीन होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी चार लाख रुपयांची मदत केली आहे.
२०१३चा दहावीचा निकाल लागल्यानंतर दिवा पूर्व येथील श्री. गुंजाळ यांचा फोन आला. त्यांची मुलगी माधुरी हिला दहावीत ९२.६३ टक्के गुण मिळाले होते. तिला वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेशही मिळाला होता. पण गुंजाळ यांचा रिक्षाचा व्यवसाय आणि दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, यामुळे माधुरीच्या शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड जाणार होता. मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो. घर साधेच पण घरातील वातावरण अतिशय सकारात्मक वाटले. दिव्यामध्ये चांगली शाळा नसल्याने गुंजाळ यांनी दोन्ही मुलांना डोंबिवलीतील चांगल्या शाळेत घातले. सुरुवातीला रोज दिव्याहून डोंबिवलीला शाळेत सोडून गुंजाळ रिक्षा चालवण्यासाठी घाटकोपरला जात असत. माधुरीला पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ८० टक्के गुण मिळाले. पहिल्या वर्षी दोन विषयांसाठी क्लासची फी दिली, पण या वर्षी आणखी एका विषयासाठी क्लासची गरज वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा अपवाद म्हणून त्यांना ७५०० रुपये दिले. मात्र, महिनाभरानेच त्यांचा फोन आला. ‘क्लास आणि कॉलेजच्या वेळा जमत नसल्याने पैसे परत करतो’ असे ते म्हणाले आणि पुढील रविवारी येऊन पैसेही देऊन गेले. त्यामुळे आणखी एका विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली. त्यांचा प्रामाणिकपणा दाद देण्यासारखाच. अनेक वेळा वाटले रोज वर्तमानपत्रांतून दिसणारी भ्रष्टाचाराची घाण वरच्या वर्गातील अधिक आहे. खालचे पाणी अजूनही खूप नितळ आहे.
दीड-दोन वर्षांपूर्वी सरस्वती विद्यामंदिर नौपाडा ठाणेच्या मुख्याध्यापिका बर्वे मॅडम यांचा फोन आला. त्यांच्या शाळेतील एक हुशार विद्यार्थी संतोष पाटील व्हीजेटीआय येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. त्याची घरची परिस्थिती चांगली नसल्याने स्वत: बर्वे मॅडम दोन वर्षे त्याचे पालकत्व करत होत्या. या वेळी प्रोजेक्टसाठी त्याला अधिक रक्कम हवी होती. म्हणून त्यांनी मला विचारणा केली. संतोष ज्ञानसाधना कॉलेजच्या मागील वसाहतीत राहातो. मी घरी गेलो. सात-आठ फुटांची खोली. वडील वाशीच्या भाजी मार्केटमध्ये हमालीचे काम करणारे. संध्याकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत त्यांची डय़ुटी. आई घरकाम करते. मी गेलो तेव्हा संतोषचा धाकटा भाऊ अजय दहावीचा अभ्यास करत होता. ‘किती मार्क्‍स मिळतील’ असं विचारल्यावर ‘९० टक्के’ असं त्याने ठासून सांगितले. त्याला दहावीत ९२.२० टक्के गुण मिळाले. सध्या वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तो सिव्हिल डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. संतोषही हुशार आहे. तिन्ही वर्षांत प्रथम येऊन त्याने ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ मिळवले. सध्या तो औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही भावंडे एवढे उज्ज्वल यश मिळवू शकली. परिसरात अभ्यासाचे वातावरण नाही, घरात टीव्ही नसला तरी आजूबाजूच्या टीव्हींचा दणदणाट सुरूच असतो. अशा परिस्थितीत ही मुले शैक्षणिक जगतात चांगली कामगिरी करत आहेत.
अशाच प्रकारे छत्रपती शिक्षक मंडळाच्या वडघर हायस्कूलच्या दुधाळ सरांनी सांगली जिल्ह्य़ातील गायत्री राजमाने हिच्यासाठी मदतीची विचारणा केली. दहावीला ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या गायत्रीला आयआयटीला जायचे होते. क्लासेसच्या दृष्टीने तिने पुण्याला प्रवेश घेतला. तिचे वडील कवठे महंकाळ येथील वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये तात्पुरते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मात्र, गायत्री अकरावीत असतानाच त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला आणि त्यांची स्मृतीच गेली. गेली दीड वर्षे गायत्रीच्या शिक्षणचा पूर्ण खर्च दात्यांच्या माध्यमातून केला. जेईईला यश मिळूनही तिला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही. मात्र, सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये तिने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला.  
अशी ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणारी मुलं. घरची परिस्थिती वाईट असतानाही त्यांची शिकण्याची जिद्द कोलमडली नाही की यश मिळवण्याचा आत्मविश्वास डगमगला नाही. अशा मुलांच्या मागे समाज उभा राहिला नाही तर, या उमलत्या कळ्याच खुडून टाकण्याचे पाप समाजाच्या माथी येईल.
रवींद्र कर्वे