28 January 2020

News Flash

‘सरबजीत’च्या चित्रीकरणासाठी शिरगाव किल्ल्याची नासधूस

शिरगाव येथील हा किल्ला समुद्रकिनारी उभा असून त्याला अभिमानास्पद इतिहास लाभला आहे.

 

दरवाजे बसवण्यासाठी भिंतीला छिद्रे; पुरातत्त्व विभाग, पोलिसांकडे तक्रार

मराठय़ांच्या पेशवेकालीन शौर्याची साक्ष देणाऱ्या पालघर तालुक्यातील शिरगाव येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सुरू असलेल्या एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऐतिहासिक वास्तूशी छेडछाड करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ऐश्वर्या राय-बच्चन आणि रणदीप हुड्डा यांची भूमिका असलेल्या या सिनेमातील एका चित्रीकरणासाठी किल्ल्याच्या भिंतींना लोखंडी दरवाजे बसवण्यासाठी ‘ड्रिलिंग’ करून खिळे ठोकण्यात आल्याप्रकरणी पोलीस तसेच पुरातत्व विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिरगाव येथील हा किल्ला समुद्रकिनारी उभा असून त्याला अभिमानास्पद इतिहास लाभला आहे. चिमाजी अप्पा यांनी १७३९ साली हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला होता. मात्र, सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अलीकडच्या काळात या किल्ल्याची वाताहत झाली आहे. या किल्ल्याच्या डागडुजी व नूतनीकरणासाठी शिरगावमधील काही इतिहासप्रेमी मंडळींनी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाच्या पर्यटन व संस्कृतिक विभागाने १ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु, त्याआधीच ‘सरबजीत’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या किल्ल्याची आणखी नासधूस करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेरी कोम’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार हे पाकिस्तानच्या तुरुंगात मरण पावलेला भारतीय शेतकरी सरबजीत यांच्या जीवनकथेवर आधारित चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण अलीकडेच शिरगाव किल्ल्यावर झाले. त्यावेळी किल्ल्यातील भिंतीना ‘ड्रिलिंग’ यंत्राच्या साह्याने भोके पाडण्यात आली. तसेच चित्रीकरणादरम्यान निर्माण झालेला कचराही येथेच टाकण्यात आला. ही बाब उघड झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक व अन्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात पुरातत्त्व विभाग व सातपाटी सागरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६०’ या कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

चित्रीकरणादरम्यानची नासधूस

*सरबजीत चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किल्ल्यातील भिंतींना लोखंडी दरवाजे बसविताना ड्रिलिंग करून खिळे ठोकण्यात आले.

*प्रवेशद्वार बंद करून पर्यटक व स्थांनिकांना रोखण्यात आले.

*भिंतीवर चित्र लावताना तैलरंग चित्रांचा वापर करण्यात आला.

*चित्रीकरण संपल्यानंतर किल्ला आणि परिसर स्वच्छ करून देण्याची लेखी हमी दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. चित्रीकरण    संपल्यानंतर किल्ला परिसरात सर्वत्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शिट्स, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, खिळे, पत्रावळी आदी  कचरा आढळला.

अटींचे पालन नाही

चित्रपटाचे चित्रीकरण करताना स्मारक व स्मारकाच्या कोणत्याही भागास इजा पोहचू नये, स्मारकास तेल, रंग अथवा बाह्य पदार्थ लावू नये, बांबू बांधणे, खिळे ठोकणे, दोरी बांधणे आदी गोष्टीही करता येणार नाहीत, स्मारकालगतचे रस्ते बंद करण्यात येऊ  नयेत, किल्ला बघायला आलेल्या पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, चित्रीकरण संपल्यावर परिसराची स्वच्छता करणे आदी बारा अटी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मान्य केल्या होत्या. मात्र त्याचे पालन करण्यात आलेले नाही.

First Published on December 23, 2015 1:32 am

Web Title: devastation of the fort siragav for the shooting of sarabjit
Next Stories
1 नाताळ कट्टय़ावर बालकांची धम्माल
2 पोलीस ठाण्याच्या पायरीवर महिलेचे उपोषण
3 डोंबिवलीत दोन दिवस दूरध्वनी, इंटरनेट बंद
Just Now!
X