महिलेचा उपोषणाचा इशारा; इमारत पाडण्यासाठी विकासकाला एमआयडीसीची मुदत
डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमधील भूखंड क्र. ४३वर एका विकासकाने एमआयडीसीच्या कोणत्याही परवानग्या न घेता बेकायदा पाच माळ्याची इमारत उभी केली आहे. या निवासी इमारतीला खेटून एक कंपनी आहे. विकासकाने इमारत बांधताना मोकळी हवा येण्यासी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे कंपनीतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्यास धोका पोहचण्याची भीती व्यक्त होत आहे. या बांधकामाविरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन सुरू केले आहे.
येथील कोंदट वातावरणामुळे शेजारील निवासी इमारतीमधील ३५ रहिवासी विविध व्याधींनी आजारी पडले आहेत, अशी माहिती या बेकायदा इमारतीविरोधात लढा देणाऱ्या मनीषा राणे यांनी दिली. एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी रहिवासी मनीषा राणे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन या बेकायदा इमारतीची पाहणी केली. इमारत उभारताना सामासिक अंतर ठेवले नाही. या भागात एक निवासी इमारत असताना त्या इमारतीला खेटून दुसरी बेकायदा निवासी इमारत उभारण्यात आली आहे. एका निवासी इमारतीत ५२ रहिवासी राहत आहेत. आग किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास या भागात येजा करणे शक्य नाही. तसेच, या इमारतीच्या बाजूने लोखंडी जिना बांधण्यात आला आहे. चौथ्या, पाचव्या माळ्यावर शाळा भरविण्यात येते, असे अभियंत्यांच्या निदर्शनास आले.
जगताप यांनी ही बेकायदा इमारत उभे करणारे विकासक मोहन नारायण पाटील (रा. प्रथमेश बिल्डिंग, गणेशनगर, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व) यांना नोटीस पाठवली आहे. येत्या ३५ दिवसात स्वत:हून ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश पाटील यांना दिले आहेत. विहित मुदतीत विकासकाने अनधिकृत इमारत तोडली नाही तर एमआयडीसीकडून तीवर कारवाई करण्यात येईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्याने सांगितले.

दिलेल्या मुदतीत ही इमारत तोडण्यात आली नाही तर आपण जिल्हाधिकारी कार्यालय, एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, असे राणे यांनी सांगितले.दोन इमारतींमध्ये जागा नसल्याने कोंदटपणा निर्माण झाला आहे.

आजारांचे माहेर
या बेकायदा इमारतीला खेटून एक इमारत आहे. त्या इमारतीत ५२ रहिवासी राहतात. पण मोहन पाटील यांनी या इमारतीला खेटून बेकायदा इमारत उभारल्याने पूर्वीपासून उभ्या असलेल्या इमारतीला येणारी मोकळी हवा बंद झाली आहे. या इमारतींच्या बाजूला कंपनी आहे. तेथे उत्पादन सुरू असताना सतत दरुगधी येत असते. अशा या किचकट जागेत ही इमारत बांधण्यात आली आहे. आपण मुख्यमंत्री कार्यालय, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांना तक्रारी केल्या. पण कोणीही त्याची दखल घेतली नाही, असे मनीषा राणे यांनी सांगितले.