कल्याण-डोंबिवली शहरातील बांधकाम विकासकांची मागणी

डोंबिवली : राज्यातील तत्कालीन भाजपप्रणीत सरकारने भिवंडी-कल्याण मार्गावर आखलेल्या मेट्रो प्रकल्पाचा कल्याण शहराला फायदा होत नसून घोडबंदर मार्गावरील गृहप्रकल्पांना ज्या प्रमाणे मेट्रो प्रकल्पाची संजीवनी देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला तसेच बुस्टर नवीन कल्याणमधील बांधकाम उद्योगाला द्या, अशी मागणी या भागातील बांधकाम व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने कल्याणच्या लाल चौकी परिसरातील फडके मैदानात २३ ते २६ जानेवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी कल्याणमध्ये मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण आणि डोंबिवली शहराचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून शहराच्या सीमा विस्तारल्या आहेत. शहरातील खडकपाडा, गोदरेज हिल, वसंत व्हॅली आणि गांधारी रोड या भागात मोठी गृहसंकुले उभी राहिली असून या भागाची ओळख नवे कल्याण अशी झाली आहे. या भागातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूलही मिळत असून या ठिकाणी आणखी मोठय़ा गृहसंकुलांची उभारणी होत आहे. असे असले तरी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून या पट्टय़ातही मेट्रो मार्ग सुरू करायला हवा, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मेट्रो सेस कराला विकासकांचा विरोध

कल्याण, डोंबिवली शहरातील नियोजित मेट्रो ५ च्या कोणत्याही कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तरी देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने डिसेंबर २०१७ पासून संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरातील नव्याने सुरू असलेल्या बांधकामांना २ टक्के मेट्रो सेस कर आकारणी सुरू केली आहे. त्याला बांधकाम व्यावसायिकांचा विरोध आहे. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येणार आहे.

मालमत्ता प्रदर्शन

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या कल्याण डोंबिवली युनिटच्यातर्फे कल्याणच्या लाल चौकी परिसरातील फडके मैदानात २३ ते २६ जानेवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गृह प्रदर्शनात ७० विकासक सहभागी होणार असून १२५ हून अधिक गृहप्रकल्पांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. तसेच या प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कार, दुचाकी आणि मोबाइल अशी विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे अध्यक्ष अरविंद वरक आणि संस्थेचे सचिव मिलिंद चव्हाण यांनी दिली.

मार्ग वळवण्याची मागणी

कल्याण, डोंबिवली शहरात येणारा नियोजित मेट्रो मार्ग ५ हा कल्याणमधील लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी महाराज चौक ते कल्याण-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती असा आहे. हा सर्व परिसर कल्याण रेल्वे स्थानक परिसर जवळ असून हा मेट्रो मार्ग जुन्या कल्याणमधून जात असल्याने मेट्रो मार्गात १२ इमारती बाधित होत आहेत. या मार्गाचा कोणताही फायदा नव्याने विस्तारित होणाऱ्या कल्याणला होत नसल्याने हा मार्ग नव्या कल्याणमधून वळवण्याची मागणी विकासकांकडून होत आहे.