प्रकल्पांमुळे कल्याण- ठाणे- भिवंडी पट्टय़ाचा कायापालट

मुंबई-ठाण्यापाठोपाठ ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावर १७ स्थानकांच्या महत्त्वाकांक्षी अशा मेट्रो प्रकल्पाची घोषणा करत राज्य सरकारने विकासाचा केंद्रबिंदू भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये असल्याचे संकेत बुधवारी पुन्हा दिले. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमध्ये कोटय़वधी रुपयांच्या रस्तेउभारणीस एकीकडे हिरवा कंदील दाखवत असताना भिवंडी परिसरात लॉजिस्टिक पार्क, साहसी क्रीडा केंद्र, अभयारण्य, विकास केंद्रांची आखणी करत एमएमआरडीएने ठाण्याच्या पलीकडे नव्या ठाण्याची पायाभरणी सुरू केल्याचे नियोजन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

एमएमआरडीएच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरमधील प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली तेव्हाच विकासाचा केंद्रिबदू आता या शहरांकडे वळल्याचे स्पष्ट झाले होते. या अर्थसंकल्पात मुंबईबाहेरील शहरांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी सुमारे ८७० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-ठाणे मार्गावर प्रवाशांसाठी दळणवळणाचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी करण्याचे बेत आखले जात असतानाच ठाणे आणि डोंबिवली हे अंतर अध्र्या तासात कापता यावे यासाठी माणकोली मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवर सहापदरी उड्डाणपूल उभारण्याच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. मुंब्रा बायपास तसेच महापे-शीळमार्गे कल्याण येथून होणाऱ्या वाहतुकीमुळे या मार्गावर पडणारा ताण उल्हास खाडीवरील पुलामुळे कमी होणार आहे. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी केल्यानंतर एमएमआरडीएने भिवंडी-कल्याण-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर उल्हास खाडीवर उड्डाणपूल उभारण्याचे निश्चित केले आहे. उल्हास खाडीवर दुर्गाडी किल्लय़ाजवळ उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे या भागातील वाहतूक अधिक वेगवान होऊ  शकणार आहे. या उड्डाणपुलाच्या सुमारे ७५ कोटी रुपयांच्या निविदेस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण ही दोन शहरे जवळ आणण्यासाठी याच मार्गावर नव्या उड्डाणपुलांच्या उभारणीचा प्रस्तावही आखण्यात आला आहे. भिवंडी शहरात रेल्वेची लोकल वाहतूक नसल्याने या शहरातील नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी कल्याणच्या दिशेने यावे लागते. त्यामुळे भिवंडी-कल्याण हा प्रवास या भागातील रहिवाशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण मार्गावर प्रमुख जंक्शनवर उड्डाणपूल उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.

साहसी क्रीडा केंद्र, अभयारण्य

ठाण्याच्या लगतच एखादे पर्यटन केंद्र उभे राहावे यासाठी भिवंडी शहरालगत खारबाव भागात साहसी क्रीडा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केला आहे. याच भागात गोदामांची मोठी संख्या लक्षात घेता लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून हा परिसर वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. खारबावलगत असलेल्या कामन पट्टय़ात तुंगारेश्वरच्या धर्तीवर अभयारण्य उभारण्याचे प्रस्तावित आहे. या संपूर्ण प्रदेशाला मोठा समुद्र तसेच खाडीकिनारा लाभला आहे. हा खाडीकिनाऱ्यांचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून याशिवाय जलाशये, हरित पट्टय़ाचे संवर्धन करण्यासाठी विविध योजनांची आखणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरान डोंगराजवळ तसेच भिवंडी परिसरात खारबाव, गणेश घाट भागात तीन प्रादेशिक उद्यानांच्या उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

बांधकाम क्षेत्राला बळकटी

भिवंडी तसेच परिसरात उभ्या राहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांची जाहिरात करताना येथील बिल्डरांनी या भागाचा उल्लेख ‘न्यू ठाणे’ असा सुरू केला आहे. मेट्रो प्रकल्पाची घोषणा तसेच पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्पांच्या आखणीमुळे या भागातील बांधकाम क्षेत्राला झळाळी मिळू शकणार आहे.