|| जयेश सामंत

ठाणे आणि आसपासच्या शहरांचे झपाटय़ाने होणारे नागरीकरण लक्षात घेता या भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेने एकत्र येऊन पावले उचलण्यास सुरुवात केली हे चित्र सकारात्मक म्हणायला हवे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत ठाणे आणि भवतालच्या प्रदेशांमध्ये अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प आखले गेले आहेत.  या प्रकल्पांच्या उभारणीचा वेग वाढवायचा असेल तर स्थानिक प्राधिकरणांनाही सोबत घेण्याची आवश्यकता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे. लगतच असलेल्या भिवंडी, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा शहरांचा विचार केला तर या संपूर्ण पट्टय़ाची लोकसंख्या ५० लाखांहून अधिक आहे आणि नागरीकरणाचा वेग पाहता वाढतेच आहे. सुरुवातीच्या काळात सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे नवी मुंबई शहराच्या विकासाला नेहमीच नियोजनाची चौकट राहिली आहे. जिल्ह्य़ातील इतर शहरांच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये बेसुमार अशी बेकायदा बांधकामे उभी राहिली असून यामुळे येथील नियोजनाचे केव्हाच तीनतेरा वाजले आहेत. महानगर पट्टय़ात ठाणे शहराला महत्त्वाचे स्थान राहिले आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी या शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळला तर या विकास आराखडय़ाची अंमलबजावणी जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत झाली आहे. घोडबंदरसारख्या नव्याने विकसित होणाऱ्या परिसराच्या नियोजनाकडेही फारसे गांभिर्याने पाहिले गेले नाही. त्याचा फटका आता बसू लागला आहे. दिवा, डायघर, डोंबिवलीलगत असलेली २७ गावे या भागांची अवस्था तर अतिशय दयनीय बनली आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर या संपूर्ण पट्टय़ाच्या विकासासाठी महानगर प्राधिकरण आणि महापालिकेने एकत्र येणे हे चित्र निश्चितच सुखावणारे आहे.

मुंबई तसेच आसपासच्या परिसराच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने अगदी सुरुवातीच्या काळापासून ठाणे तसेच इतर शहरांकडे फारसे लक्ष दिले नाही. मुंबईत स्कॉयवॉकच्या उभारणीवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महानगर प्राधिकरणाने ठाणे तसेच आसपासच्या शहरांना तशी सापत्न वागणूक दिली. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या पट्टय़ातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याचे आदेश प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ कल्याण-भिवंडी मेट्रोची आखणी सुरू झाली आहे. बदलापूर शहरातही मेट्रोचे जाळे विणले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई महानगर प्राधिकरणाने पुढील २० वर्षांसाठी आखलेल्या नियोजनात भिवंडी पट्टय़ात तब्बल १५ ठिकाणी विकास केंद्रांची आाखणी केली आहे. वांद्र-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर कल्याण भागात विकास केंद्राच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे-डोंबिवलीचा प्रवास वेगाने व्हावा यासाठी माणकोली खाडीवर पुलाच्या उभारणीचे काम संथगतीने सुरू असले तरी येत्या काळात ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर बुलेट ट्रेन आणि नवीन ठाणे शहरांच्या अनुषंगाने ठाणे आणि डोंबिवलीकडील बाजूच्या विकासासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले असून हा विकास करत असताना महानगर प्राधिकरणाने महापालिकेची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला हे स्वागतार्ह म्हणायला हवे.

नव्या ठाण्याच्या विकासाचे आव्हान

घोडबंदर भागाचे वेगाने होणारे नागरीकरण पाहता मुंबई, ठाण्यातील बडय़ा बिल्डरांनी ठाण्याच्या पलीकडे भिवंडी परिसराकडे आपला मोर्चा वळविला आहे. सद्य:स्थितीत हा भाग मुंबई महानगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. ठाणे, खारबाव, पायबाव, माणकोली, भिवंडी या पट्टय़ातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन महानगर प्राधिकरणाने येथूनच कल्याण मेट्रोची आखणी केली आहे. मात्र मेट्रोच्या आखणीपुरता हा विकास थांबू नये यासाठी महानगर आयुक्त आर. ए. राजीव प्रयत्नशील आहेत. आर. ए. राजीव ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनी नवीन ठाण्याच्या विकासाची कल्पना पुढे आणली होती. त्यांची बदली झाल्यानंतर हा विषय मागे पडला. विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राजीव यांची कल्पना उचलून धरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही प्राधिकरणांनी त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याच्या पलीकडे नव्या शहराची नियोजनबद्ध बांधणी करायची असले तर घोडबंदर मार्गाला समांतर रस्ता तसेच आसपासच्या परिसरात पायाभूत सुविधांची आखणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महानगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेला काही भाग ठाणे महापालिकेस हस्तांतरीत करावा असा महापालिकाचा प्रस्ताव आहे. महापालिकेने या भागात शहर उभारणीसाठी विकास आराखडय़ाची आखणी करावी आणि एमएमआरडीएने खर्चीक प्रकल्पांचा भार खांद्यावर घ्यावा असे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. हे करत असताना दिवा, म्हातार्डी भागात उभ्या राहणाऱ्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या अनुषंगाने या भागाचाही विकास करण्यासाठी या दोन्ही प्राधिकरणांनी संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याण-शीळ मार्गावर एमएमआरडीएने यापूर्वीच काही प्रकल्पांची आखणी केली आहे. महापालिकेने त्यात काही बदल सुचविले असून या प्रकल्पांची बांधणी करताना दिवा, आगासन तसेच डायघर भागातील अंतर्गत विकासकामांची त्यास जोड देण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे पुढे आणण्यात आला आहे. एमएमआरडीएने या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविल्याने वर्षांनुवर्षे दुर्लक्षित पट्टय़ाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न होतील, असे चित्र आहे. ठाणेच नव्हे कल्याण, डोंबिवली, भिवंडी अशा शहरांसाठीही या दोन्ही प्राधिकरणांमधील समन्वय महत्त्वाचा ठरू शकेल.