|| नीलेश पानमंद/जयेश सामंत

गावांच्या विकासासाठी एकात्मिक आराखडा; सुविधांच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रालाही झळाळी

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण

ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन शहरांच्या त्रिकोणात वसला असतानाही विकास आणि प्राथमिक सुविधांपासून कायम वंचित असलेल्या दिवा आणि डायघर परिसराचा कायापालट करण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. या भागातील शाळा, दवाखाने, रुग्णालये, रस्ते या सुविधांच्या विकासासाठी पालिकेने तब्बल दोन हजार ८५ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे या परिसरातील गावांचे रूपडे पालटणार आहेच; पण त्याबरोबरच येथे प्रचंड प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहण्याचीही चिन्हे आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात बांधकाम उद्योगांमध्ये मंदीचे सावट असल्याची ओरड सातत्याने होत असली तरी महापालिका हद्दीतील घोडबंदर आणि कल्याण-शीळ रस्त्यालगत मोठय़ा प्रमाणावर नवे गृहप्रकल्प उभे राहात आहेत. ठाणे आणि कल्याण महापालिकेच्या वेशीवर मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरने विशेष नागरी वसाहतीची उभारणी केली असून याच भागात बडय़ा बिल्डरांनी शेकडो एकर क्षेत्रफळात जमीन खरेदी केली आहे. मात्र दिवा, डायघर तसेच शीळ या परिसरांची शून्य नियोजन आणि नागरी सुविधांअभावी बजबजपुरी झाली असून त्याचा प्रतिकूल परिणाम या भागातील बिल्डरांच्या गृहप्रकल्पांवरही होत आहे. येथील गावे तसेच आसपासच्या परिसराचा युद्धपातळीवर विकास हाती घ्यावा तरच कल्याण-शीळ मार्गाचे घोडबंदर होऊ शकेल, असा दबावही विकासकांच्या एका मोठय़ा गटाकडून सातत्याने महापालिका प्रशासनावर होता. हे लक्षात घेऊन महापालिकेनेही त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून दिवा आणि डायघरचे रूपडे पालटण्यासाठी दोन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे.

डायघर तसेच आसपासच्या गावांसाठी महापालिकेने दोन हजार ८५ कोटी ३५ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यापैकी २०१८-१९ या आर्थिक वर्षांत विकासकामांसाठी ८६४ कोटी ५० लाख रुपये तर २०१९-२० या आर्थिक वर्षांत एक हजार २२० कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. त्यानुसार प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

विकासाच्या योजना

  • कल्याणफाटा ते काशीनाथ चौक या रस्त्याच्या मधून दोन नाले जात असून या नाल्याच्या मोऱ्या छोटय़ा असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे दोन्ही नाल्यांचे आकार वाढविण्यात येणार आहेत.
  • डायघर येथील शौचालयाचे बांधकाम तोडून त्या जागी बालवाडी आणि वाचनालयासाठी तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
  • तळ अधिक दोन मजल्याच्या शाळेच्या बांधकामाची दुरुस्ती, नानासाहेब धर्माधिकारी हॉल ते कॅफेनगर आणि बालवाडी ते गावदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे या निधीतून करण्यात येतील.
  • डायघर तलावाचे सुशोभीकरण, देसाई गावातील शिवाजी मैदान येथे संरक्षक भिंत बांधणे, डायघर येथे आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृह बांधणे, डायघर जुना गाव चौकात हायमास्ट बसविणे, खिडकाळी येथे कारंजा बसविणे, डायघरमध्ये पथदिवे आणि विद्युत व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कामे करणे.
  • देसाई, खिडकाळी, पडले, शिळ, फडकेपाडा येथील शाळांची दुरुस्ती करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय, काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.