जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची बदली; वाळू माफियांपुढे सरकार शरण गेल्याची भावना
नाविन्यपूर्ण उपक्रम, पारदर्शकता, शिस्त आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यामुळे प्रशासकीय कारकिर्दीचा वैशिष्टय़पूर्ण मापदंड निर्माण करणाऱ्या ठाण्याच्या
जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची अवघ्या दीड वर्षांत बदली करण्यात आल्याने अखेर मुख्यमंत्री पक्षांतर्गत दबावाला बळी पडले, अशा प्रकारची भावना ठाणे परिसरात व्यक्त होत आहे. बेधडक कारवाईद्वारे डॉ. जोशी यांनी वाळूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर जरब बसवली होती. त्यांनी अल्पकाळात महसुली उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापीत केला. टाऊन हॉलचे नूतनीकरण करून एक चांगले कलादालन त्यांनी ठाणेकरांना उपलब्ध करून दिले. साकेत येथील जैव विविधता उद्यान, मुंब्रा येथील चौपाटीचे कामही त्यांनी मार्गी लावले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन हजाराहूंन अधिक वनराई बंधारे बांधून त्यांनी जलसंवर्धनाचे मोठे काम केले.
लोकाभिमुख प्रशासकीय कारभारामुळे जनसामान्यांमध्ये लोकप्रियता मिळविणाऱ्या डॉ. जोशी यांना हितसंबंध दुखावल्या गेलेल्या राजकीय मंडळींचा रोष पत्करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बेकायदा बांधकामास त्यांनी स्थगिती दिली. भिवंडी येथील खाडी किनारी उभारण्यात आलेली अनधिकृत गोदामे जमीनदोस्त करून त्यांनी त्याआधारे आपली पाटीलकी गाजविणाऱ्या भाजपच्या एका वजनदार नेत्याला दुखावले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या तंबूत दाखल झालेल्या कल्याणमधील एका आमदाराचे साम्राज्यही जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे धोक्यात आले होते. हितसंबध दुखावलेल्या राजकीय व्यक्तींनी डॉ. जोशी यांनी बदली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. त्यातूनच चार महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र तेव्हा त्या संभाव्य निर्णयाविरूद्ध नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. लवकरच सर्वसाधारण बदल्यांमध्ये त्यांना येथून हटविले जाईल, असे बोलले जात होते. ती शंका बुधवारी रात्री काढण्यात आलेल्या आदेशाने खरी ठरली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री उशिरा निघाले. रात्री साडेदहा वाजता बदल्या करण्याएवढी कोणती घाई होती? कर्तबगार जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची अतिशय अल्पकाळात उचलबांगडी केल्याचे समजले. वाळू माफिया आणि भूमाफियांपुढे सरकार नतमस्तक झाले, असेच याबाबतीत म्हणावे लागेल.
– महेंद्र मोने, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे.

अश्विनी जोशी यांनी जिल्हाधिकारी म्हणून खूपच चांगली कामगिरी केली. अतिशय अल्पकाळात त्यांनी खूप नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले. त्यांची मुदतीच्या आधी बदली होणे अनाकलनीय आहे. ‘अच्छे दिन’चे आश्वासन हेही मृगजळच आहे, हे यातून स्पष्ट होते.
– संजीव हजारे, नागरिक.