मीरा-भाईंदरमधून प्रकाशित होणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रावरून भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री भर रस्त्यात गोंधळ घातला. या वेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाईंदर पश्चिम येथील मुख्य रस्ता सुमारे तासभर रोखून धरला तसेच वृत्तपत्राचे संपादक रहात असलेल्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मीरा-भाईंदरमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘राजसत्ता’ या साप्ताहिकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेपार्ह छायाचित्र छापण्यात आले होते. हे छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरू लागल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा रागाचा पारा चढला. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांचे आपत्तीजनक छायाचित्र छापणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादकावर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र अचानक आमदारांसह कार्यकर्त्यांनी ‘राजसत्ता’चे संपादक वसंत माने रहात असलेल्या इमारतीकडे मोर्चा वळवला. या वेळी मुख्य रस्ता रोखून धरण्यात आला. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली, तसेच नागरिकांनाही मनस्ताप सोसावा लागला. या वेळी कार्यकर्त्यांनी इमारतीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप माने यांनी केला आहे. वसंत माने यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितल्यावर आणि पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे तासभर सुरू असलेला हा गोंधळ संपुष्टात आला.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या मर्यादेत राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असताना मुख्यमंत्र्यांचे बदनामीकारक छायाचित्र प्रसिद्ध करणे सर्वस्वी चुकीचे असल्याने लोकशाहीमार्गाने आंदोलन केल्याचे आ. नरेंद्र मेहता यांनी या वेळी सांगितले. दुसरीकडे या प्रकरणात कायदेशीर मार्गाने दाद मागण्याचा मार्ग असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन नागरिकांना वेठीस धरल्याने तसेच संपादक माने यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा मीरा भाईंदर महानगरपालिका वार्ताहर संघाच्या वतीने पोलिसांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.