डोंबिवलीतील साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मातृभाषेतून घेतलेले शिक्षण तात्काळ आत्मसात होते. त्यासाठी कोणता विचार करावा लागत नाही. या भाषेला तंत्रज्ञानाची जोड दिली तर ही भाषा समाजाच्या विशिष्ट चौकटीत अडकून न राहता, ती जात, धर्म, पंथ आणि लिंगाच्या वेशी ओलांडून आपल्याला अभिप्रेत असलेल्या बहुजन समाजापर्यंत पोहचविणे शक्य होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी असली पाहिजे. यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डोंबिवलीत भरलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर दिली.

चीन, जपान, कोरिया यांसारखी राष्ट्रे वेगवान प्रगती करीत आहेत. या वेगाच्या मुळाशी या देशांनी तेथील माहिती तंत्रज्ञानाची भाषा मातृभाषा ठेवली आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण समाजाला उन्नत करते, त्याबरोबर ते कोणाचा आधार न घेता डोक्यात शिरते. असे तंत्रज्ञानपूर्ण माृतभाषेतील ज्ञान समाजाच्या तळागाळात, बहुजन, आवाज नसलेल्यांच्या पर्यंत पोहचले तर ते समाजाचा परिपूर्ण विकास होण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी साहित्यात जेवढे साहित्यिक निर्माण झाले, तेवढे जगाच्या कोणत्या भाषेत झाले नाहीत. वैचारिक ज्ञानातून खरे अभिसरण समाजमनात होत असते. या अभिसरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी महाराष्ट्र, मराठी भाषेने पार पाडली आहे. त्यामुळे मराठीचा आत्मविश्वास येथील समाजाला, महाराष्ट्राला आहे. मराठी भाषा स्वत: जगली, तिने महाराष्ट्राला, येथल्या समाजाला जगवले, समृद्ध केलंय, त्यामुळे या भाषेविषयीचा आत्मविश्वास महाराष्ट्राला आहे. सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही जगातील एकमेव बोलीभाषा आहे. या भाषेने साहित्यिक निर्माण केले. त्या माध्यमातून वेगळा विचार समाजाला मिळाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठी साहित्याचा अधिकाधिक अनुवाद परकीय भाषांमध्ये होणे आवश्यक आहे, हे विचार समीक्षक विष्णू खरे यांनी मांडले. त्या विषयी सहमती दर्शवीत मुख्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत मराठी भाषेतील साहित्य जगभरातील साहित्यात अनुवादित होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा, आपल्या साहित्यिक, साहित्याचा विचार जगभरात पोहचणार नाही. नोबेल पुरस्कार मिळतील या तोडीचे साहित्यिक मराठीत आहेत, पण आपले साहित्य बाहेर जाणार नसेल तर पुरस्कार नाहीच, पण आपले प्रगल्भ विचार आपण परकीय साहित्यात पोहचू शकणार नाहीत. मराठी साहित्य अनुवादाचा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

साहित्य, मराठी व्यवहाराबाबत राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे राहत नाही, अशी खंत व्यक्त करून हा तिढा लवकर सोडविला जाईल, असे ते म्हणाले. मराठी शाळा शासन अनुदानावर नाही तर या भाषेची शाश्वत मूल्ये कायम ठेवून मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. ही भाषा शिक्षण, सहित्य या माध्यमातून संक्रमित झाली पाहिजे; तरच ती २१ व्या शतकात तग धरणार आहे. शासनाने डिजिटल शाळा हा उपक्रम राज्यात राबविल्यामुळे मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलीय. विद्यार्थ्यांची आकलन शक्तीत वाढ झाली आहे. शाळांमधील माहिती तंत्रज्ञान शिक्षणाची भाषा मराठी झाली पाहिजे. हे करताना शाश्वत मूल्ये कायम ठेवली तर हे सर्व साध्य होणार आहे. त्या दिशेने शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

२७ गावांविषयी सकारात्मक

ल्लस्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी आपल्या भाषणातून २७ गावांविषयी भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या यापूर्वीच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला नाही. जी भूमिका २७ गावांची, २७ गाव समितीचे प्रमुख वझे यांची आहे, तीच माझी भावना आहे. फक्त यापुढे काय आणि कशा प्रकारे करायचे एवढेच काम बाकी आहे. आचारसंहिता असल्याने काही बोलता येणार नसले तरी याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगून २७ गावांच्या नगरपालिकेचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

काळे झेंडे, घोषणाबाजी

  • २७ गावे वगळण्यात शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस बंदोबस्तामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. निषेधाचे फलक दाखवून त्यांनी २७ गावे पालिकेतून मुक्त करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच, बेळगाव सीमावासीयांनी आम्हाला महाराष्ट्रात सहभागी करून घ्या, अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असे सांगितले.

आयोगाला चिमटे

  • शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्री संमेलनाला येणार नाहीत, असे माध्यमांनी परस्पर जाहीर केले. पण निवडणूक आयोगाने मोठेपणा दाखवून या संमेलनाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली. परवानगी मिळाली नसती तर, निवडणूक आयुक्तांना उद्घाटक म्हणून यावे लागले असते, अशी कोपरखळी त्यांनी मारली. संमेलनाला जाताय तेव्हा तुमचे भाषण घोषणामुक्त असावे, ते अगोदर आमच्याकडे पाठवा मग ते संस्कार करून दिल्यावर बोला, असेही आयोगाकडून सांगण्यात आले नाही हे नशीब, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पवार अनुपस्थित

  • संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते, पण निमंत्रणपत्रिकेत पवार यांचे नाव मान्यवरांच्या यादीत खाली गेल्याने, ते नंतर संयोजकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्र्यांच्या समांतर प्रसिद्ध करीत नवीन निमंत्रणपत्रिका तयार करण्यात आली. या मानापमानाच्या नाटय़ात पवार यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.

बाबासाहेब पुरंदरेंचे विस्मरण

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शुक्रवारी सकाळी डोंबिवलीजवळील खिडकाळी येथे कार्यक्रमासाठी आले होते. संमेलनाचे निमंत्रण नसल्याने शिवशाहीर संमेलनाकडे फिरकले नाहीत. पण पत्रकारांशी बोलताना त्यांनी साहित्याच्या निर्मितीसाठी सर्व समाजमन, लेखक, साहित्यिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी अशी संमेलने आवश्यक आहेत. मराठीच्या उत्कर्षांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे.