फेब्रुवारीमध्ये ठाण्यात अखिल भारतीय नाटय़ संमेलन होणार अशी मोठीच एक चांगली बातमी जाहीर झाली आणि अनेक नाटय़ रसिकांना एका मेजवानीची चाहूल लागली. नाटय़पंढरी म्हणावे असे हे शहर बघता बघता पुढच्या दोन महिन्यांत कात टाकेल आणि ठाण्यात येणाऱ्या कलावंतांचे स्वागत करायला सज्ज होईल.
ठाण्यात दोन नाटय़गृहे आहेत आणि या दोन्ही नाटय़गृहांना रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. तर तिसरे नाटय़गृह कळवा येथे प्रस्तावित आहे. गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर या दोन्ही नाटय़गृहांना मिळालेला प्रतिसाद पाहता कळव्यात तिसरे नाटय़गृह उभे राहिले तरी ते हाऊसफूल व्हायला वेळ लागणार नाही. मुळात ठाण्यामध्ये आज अनेक आघाडीचे कलावंत वास्तव्यास आहेत. तर ‘टॅग’ नावाची संस्था स्थापन करून ते वर्षभर विविध उपक्रम राबवत आहेत आणि एकजुटीने काम करत आहेत. यासोबतच ठाण्यात एकांकिका महोत्सव बालनाटय़ महोत्सव लावणी महोत्सव असे
अनेक उपक्रम वर्षभर सुरूच असतात. त्यामुळे ठाण्याचे नाटकाशी जवळचे नाते आहे. अशा वेळी होणारे नाटय़ संमेलन हे नक्कीच ठाणेकरांसाठी पर्वणी ठरेल. यावर्षीचे नाटय़ संमेलन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कोकणी मालवणी बाज असलेला लेखक या नाटय़ संमेलनाच्या अधयक्षस्थानी असल्यामुळे स्वाभाविकता कोकणातील नाटय़वेडय़ा रसिकाची उत्सुकता या संमेलनाबाबत अधिक आहे. ठाणे आणि परिसरात कोकणी माणूस मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे संमेलन विशेष ठरणार आहे.
यापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन ठाण्यात झाले. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. कलासक्त ठाण्यात अशी संमेलने आजपर्यंत सगळीच यशस्वी झाली. त्यामुळे हेही संमेलन रसिकांच्या प्रतिसादाने यशस्वी होईल यात शंका नाही. फक्त या संमेलनाच्या निमित्ताने नव्याने नाटय़ चळवळीशी जोडल्या जाणाऱ्या तरुणाला कसे सामावून घेणार आहेत याबाबतही उत्सुकता आहेच.
ठाण्याच्या ग्रामीण भागातील अनेक नाटय़वेडी माणसे आहेत त्यांच्यापर्यंत हे संमेलन पोहोचणार आहे की नाही? तेही महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे तसे पाहिले तर कोकणात येते आणि एक कोकणी माणूस या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहे. त्यामुळे स्वभावत: कोकणातले दशावतार, नमननाटय़ याला या संमेलनात कोणते मानाचे पान मिळणार याबाबतही तेवढीच उत्सुकता आहे. ठाण्यातील साहित्य संमेलनाच्या नियोजनात असणारी काही माणसे याही संमेलनाच्या आयोजन समितीवर आहेत. आणि संमेलन म्हटले की वाद हेही अटळच आहे. पण वादाचे नाटय़ रंगण्यापेक्षा नाटय़वेडय़ा कोकणी माणसाच्या जडणघडणीत नाटकांचा वाटा आणि भविष्यातील नाटकासमोरील आव्हान, बदलत्या ठाण्यातील नाटय़ चळवळीची दिशा आणि तरुणांचा सहभाग या सर्वच विषयांवर हे संमेलन निर्णायक चर्चा आणि परिसंवाद त्वरित पूर्ण झाले तर गेले काही दिवस ओस पडलेला गडकरीचा कट्टा पुन्हा एकदा तरुणाईने गजबजून जाईल.
आणि याच गडकरीच्या कट्टय़ावरून आजचे आघाडीचे कलाकार, दिग्दर्शक आणि तांत्रिक कामे करणारी नवी पिढी पुढे आली. कॉलेजच्या एकांकिकांपासून गडकरीत येणाऱ्या नव्या नाटकापर्यंत चर्चा जोडत या कट्टय़ावर येऊन बसणारे तरुण संधीच्या शोधात गडकरी कट्टय़ापर्यंत यायचे आणि एक दिवस नाटकाशी आपसूक जोडले जायचे. पण गेल्या काही वर्षांत हा कट्टा ओस पडला आहे. या निमित्ताने या कट्टय़ाची आठवणही या संमेलनात सहभागी होणाऱ्या ठाण्यातील कलाकारांना झाली तरी त्यांचे जुने दिवस त्यांना आठवतील आणि नव्याने येणाऱ्यांना नव्या वाटा दिसू लागतील.

– प्राची