नातवाईकांचा आरोप; कोपरीतील पालिकेच्या केंद्रातील प्रकार 

कोपरी येथील महापालिकेच्या डायलेसिस केंद्रात बुधवारी सकाळी उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन संपल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपानंतर डायलेसिस केंद्रातील कारभारावर सर्वत्र टीका होऊ लागली असून त्याची गंभीर दखल घेत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्य समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर या घटनेला डॉक्टर जबाबदार होते का, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

कोपरी परिसरात महापालिकेचे शेठ लखिमचंद फतीचंद प्रसूतिगृह असून येथे महापालिकेने काही महिन्यांपूर्वी डायलेसिस केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये कोपरीतील सिंधी कॉलनीत राहणारे नरेंद्र वाजीरानी (६१) हे गेल्या सहा महिन्यांपासून डायलेसिस उपचार घेत होते. बुधवारी सकाळी ते डायलेसिस केंद्रामध्ये उपचारासाठी गेले होते. तिथे त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. ते संपल्यानंतर दुसरे ऑक्सिजन लावण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु नातेवाईकांच्या आरोपामुळे डायलेसिस केंद्रातील कारभारावर सर्वत्र टीकेचा सूर उमटू लागला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे. त्यामध्ये कळवा रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगेश शर्मा, बधिरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा सावंत आणि किडणीतज्ज्ञ डॉ. गुंजोरीकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी दिले आहेत. या चौकशीत कोणी दोषी आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

तसेच नरेंद्र यांच्या मृत्यू प्रकरणामुळे डायलेसिस केंद्र चालविणाऱ्या संस्थेचे काम बंद करण्यात यावे. जेणेकरून अन्य रुग्णांच्या बाबतीत असा प्रकार घडणार नाही. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट या संस्थेने आयुक्त जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

कागदपत्रांची तपासणी करणार

नरेंद्र वाजिरानी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे चौकशी समिती आता रुग्णावर सुरू असलेल्या उपचारांची कागदपत्रांची तपासणी आणि प्रत्यक्षदर्शीकडे चौकशी करणार आहे. त्या आधारे या प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीकडून तयार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.