१०० ग्रामस्थांना बाधा
शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील दहिगाव गावात सुमारे १०० ग्रामस्थांना डायरियाची (जुलाब व उलटी) बाधा झाली आहे. बाधितांना खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दहिगाव गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी कधीच सरकारी डॉक्टर उपलब्ध नसतात. या प्राथमिक केंद्राच्या आवारात गाईगुरे बसलेली असतात. एवढी दुरवस्था या केंद्राची झाली आहे. या केंद्रात डॉक्टर, परिचारिका नसल्याने सर्वसामान्यांना उपचार घेण्यासाठी खर्डी, नाहीतर शहापूर येथे जावे लागते, असे ग्रामस्थ नवनाथ दुधेले यांनी सांगितले.
दहिगावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कधीच ग्रामपंचायतीकडून साफ केली जात नाही. त्यामुळे जलकुंभाच्या तळाला घाण साचून ती पिण्याच्या पाण्याद्वारे घराघरात जात आहे. त्यामधून हे आजार पसरत असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसेविका शिंदे यांच्याशी सतत संपर्क करूनही त्या उपलब्ध झाल्या नाहीत.
गावांमधील पाणीपुरवठय़ाच्या सुविधा योग्य आहेत की नाही? सार्वजनिक ठिकाणच्या विहिरींचे पाणी स्वच्छ आहे का? हे पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांच्या अंतर्गत मलेरिया रुग्ण कामगार (एम. पी. डब्ल्यू.) असतात. हे कामगार अलीकडे गावोगावी फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे हे कामगार प्रत्यक्ष काम करतात काय? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दहिगावमधील १० ते १२ ग्रामस्थांना जुलाब व उलटीची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. काही ग्रामस्थांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. १०० रुग्ण रुग्णालयात दाखल नाहीत. दूषित पाण्यातून हा प्रकार होऊ शकतो. गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येऊन चौकशी केली जाईल.
– डॉ. वाघमारे,वैद्यकीय अधिकारी, खर्डी ग्रामीण रूग्णालय, शहापूर