tvlog‘स्वर्गामध्ये जसे अमृत तसा पृथ्वीवर आंबा’ अशा शब्दात फळांच्या राजाची महती सांगितली जाते. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वानाच आंबा विशेष प्रिय आहे. अशा या आंब्याचे विविध प्रकार चाखण्यासाठी कोरम मॉल व्यवस्थापनाने ‘आम लीला’ हा उपक्रम सुरूकेला आहे. या उपक्रमाअंतर्गत तोंडाला पाणी आणणारे ‘मॅन्गो चिजकेक’, ‘मॅन्गो शुटर’, ‘मॅन्गोला शोफल’, ‘मॅन्गो ट्राट्स’,आणि ‘मॅन्गो पॅनाकोटा’ आदी पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ६ मे रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कंपाउण्डजवळ, ठाणे (प.) येथे ही कार्यशाळा होणार आहे.
’कधी : दुपारी ३ ते ६
’कुठे : कोरम मॉल, ठाणे (प)

बच्चेकंपनीचे ‘नाटय़संमेलन’
ठाणे शहरातील मुला-मुलींमधील अभियन गुणांना वाव तसेच प्रोत्साहन देण्यासाठी चिल्ड्रेन्स थिएटर अकॅडमीने बालरंगभूमी नियामक मंडळाच्या सहकार्याने ठाण्यात पहिले ‘बालरंगभूमी संमेलन व महोत्सव’ आयोजित केला आहे. बालमित्रांसाठी पर्वणी ठरणारा हा महोत्सव ८ ते १० मे या कालावधीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे रंगणार आहे. शुक्रवार ८ मे रोजी सकाळी ११ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवाच्या निमित्ताने मराठी, हिंदी, इंग्रजी बालनाटय़ाबरोबरच नाटय़शाळेच्या विशेष मुलांद्वारे काही मजेशीर बालनाटय़ सादर करण्यात येणार आहेत. बालरसिकांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. कळसूत्रीनिर्मित मुखवटे व बाहुल्यांच्या नाटकाचा प्रयोग, एकपात्री नाटय़प्रयोग, नामवंत व्यंगचित्रकारांचा ‘हास्यशाही’ प्रयोग, श्ॉडो प्ले, नृत्यनाटय़, फॅशन शो, जादूचे प्रयोग आदी प्रयोग मान्यवरांतर्फे सादर केले जाणार आहे.
’कधी : ८ ते १० मे
’कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प)

मोहनवीणा-बासरी जुगलबंदी
भारतीय वीणा आणि पाश्चिमात्य गिटार या दोन वाद्यांच्या मिलापातून ‘मोहनवीणा’ वाद्याची निर्मिती करणारे ग्रॅमी पुरस्कार विजेते पं. विश्वमोहन भट आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मजुमदार यांची जुगलबंदी ऐकण्याची संधी कल्याणकरांना लाभली आहे. ‘होरायझन’ या संस्थेतर्फे शुक्रवार ८ मे रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात रात्री ८.४५ वाजता ‘समांतर’ या कार्यक्रमाअंतर्गत या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वादकांची जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२०५७८२९८
’कधी-शुक्रवार- ८ मे, रात्री साडेआठ
’कुठे- आचार्य अत्रे नाटय़गृह, कल्याण

लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम
बॅण्ड म्हटले की डोळय़ांसमोर रॉक, पॉप संगीताचे बॅण्ड येतात. पण, इंडियन सागा रॉक बॅण्डने लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम घडवून आणला आहे. नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थी ध्रुव राठोड, केनिल सांगवी, प्रयाग शेणॉय, राहुल नायक, तेजस पारेख हे रॉक बॅण्डचा नजराणा सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या वीकेण्डची रंगत वाढविण्यासाठी रॉक बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ९ मे रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत विविआना मॉल, ठाणे (प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
’कधी : सायंकाळी ६.३० ते रात्री ९
’कुठे : विविआना मॉल, ठाणे (प)

उदयोन्मुख कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
ठाणे – चित्रकला, छायाचित्रणकला आणि हस्तकला आदी विषयात पारंगत असणाऱ्या तरुण कलाकारांच्या चित्रांचे, छायाचित्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ठाणे पूर्वेतील कलाकार महेश कोळी यांच्या प्रयत्नाने भरविण्यात आले आहे. ऑलसिन तुस्कानो आणि अनिमेश क्षत्रिय या दोन कलाकारांची ६० छायाचित्रांचे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य १० चित्रकारांची ६० चित्रे आणि विविध कलाकृतीही या प्रदर्शनात पाहता येतील. प्रदर्शनाचे उद्घाटन कलाकारांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आले.
’कधी : ७ ते १० मे
’कुठे : खुले कलादालन, अष्टविनायक चौक, ठाणे (पू).
’संपर्क : अनिकेत पालांडे झ्र् ७४९८२२५२९९

एक घुमक्कडी-घुमानची
दुचाकीवरून रोमची सफर करून आलेले सुप्रसिद्ध लेखक प्रवीण कारखानीस जगभरात भ्रमंती करून तेथील वेचक-वेधक सातत्याने रसिकांपुढे ठेवत असतात. नुकत्याच पंजाबमधील घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही एक रसिक या नात्याने सहभागी झाले होते. घुमानभेटीविषयीचे त्यांचे अनुभवकथन ऐकण्याची संधी अंबरनाथमधील ग्रंथाभिसरण सार्वजनिक वाचनालयाने उपलब्ध करून दिली आहे. रविवारी १० मे रोजी संस्थेचे कै. श्रीराम देशमुख सभागृह, कानसई, अंबरनाथ (पूर्व) येथे संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांचे एक घुमक्कडी-घुमानची हे अनुभवकथन होईल. व्याख्यानानंतर संध्याकाळी साडेसात वाजता संस्थेचे घेतलेल्या बुकमार्क स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश आहे.
* कधी- संध्याकाळी सहा वाजता
* कुठे- ग्रंथाभिसरण सार्वजनिक वाचनालय, कानसई, अंबरनाथ (पूर्व).    

पं. फिरोझ दस्तूर संगीत महोत्सव
किराणा घराण्यातील सुप्रसिद्ध गायक पं. फिरोझ दस्तूर मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार ८ ते १० मे दरम्यान संध्याकाळी सहा वाजता सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प) येथे संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दत्तात्रय गवळकर आणि उस्ताद राजामियाँ, शनिवारी आरती ठाकूर-कुंडलकर आणि गिरीश संझगिरी तर रविवारी शरद साठे व वैभव नागेशकर मैफल सादर करणार आहेत. मैफलीत गिरीश नलावडे आणि प्रशांत पांडव (तबला) तसेच सुयश कुंडलकर, श्रीनिवास आचार्य, प्रभाकर पांडव, अतुल फडके व डॉ. दिलीप गायतोंडे (हर्मोनियम) साथीला आहेत.
 प्रवेश विनामूल्य आहे.   
* कधी : सायंकाळी ६ वाजता
* कुठे : सहयोग मंदिर सभागृह, २रा मजला, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे(प) .
संकलन : शलाका सरफरे