विविध पक्षांच्या बंडखोर उमेदवारांची माघार

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला. मतविभागणी आणि पराभव टाळण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सोमवारपासून बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यात बऱ्यापैकी यश मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजपचे संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोजा यांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले असतानाच मानपाडा-मनोरमानगर प्रभागातील भाजपचे उमेदवार जयनाथ पुर्णेकर यांनी माघार घेऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीतील अधिकृत उमेदवारांच्या यादीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत कमालीची गुप्तता पाळली होती. मात्र, अखेरच्या दिवशी यादीत नाव नसल्याचे लक्षात येताच सर्वच पक्षातील इच्छूकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण यंदा जास्त दिसले. भाजपचे जुने नेते सुभाष काळे यांच्यासह २० ते २२ जणांनी बंडखोरी करत पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका पुजा वाघ, नम्रता भोसले, माजी महापौर स्मिता इंदूलकर, महिला उपशहर प्रमुख प्रमिला भांगे यांनीही बंडखोरी केली होती. या बंडखोरांमुळे मतविभागणी आणि पराभवाचा धोका लक्षात घेऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढण्यास सुरूवात केली होती. शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर भाजपमध्ये राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बंडखोरांशी संपर्क साधून त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर मंगळवारी अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. शिवसेनेतील बंडखोर विद्यमान नगरसेविका पुजा वाघ, नम्रता भोसले, शाखाप्रमुख वैकुंठ म्हात्रे, शारदा म्हात्रे यांनी माघार घेतली. भाजपतील बंडखोर अ‍ॅड. सुभाष काळे, शशी यादव यांनी अर्ज मागे घेतले.

भाजपला धक्का..

मानपाडा-मनोरमानगर प्रभागातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे जयनाथ पूर्णेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपला जोरदार धक्का दिला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पुर्णेकर यांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यांना मानपाडा-मनोरमानगर प्रभागातून उमेदवारी देण्यात आली.  याच प्रभागातून त्यांचे चुलत बंधु छत्रपती पुर्णेकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जयनाथ यांनी निवडणुकीतून माघार घेत छत्रपती यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.