15 July 2020

News Flash

जागेचा शोध संपेना

कडोंमपा हद्दीत एक हजार खाटांचे ‘कोविड’ रुग्णालय उभारण्यात अडचणी

डोंबिवलीतील सावळाराम पाटील क्रीडासंकुलातील बंदिस्त जागेची पाहणी पालिका आयुक्तांकडून नुकतीच करण्यात आली.

कडोंमपा हद्दीत एक हजार खाटांचे ‘कोविड’ रुग्णालय उभारण्यात अडचणी

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : करोना रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन सुसज्ज ‘कोविड’ रुग्णालय उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेला जागेचा शोध अद्याप संपलेला नाही. शहरात एक हजार खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. मात्र तशी जागाच कुठे नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोविड रुग्णालयांची बांधणी सुरू केली आहे. ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने शहरात प्रत्येकी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारणीचे काम सुरू केले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनानेही ग्रामीण तसेच अर्धनागरी वस्त्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा रुग्णालयांच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात पावसाळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे उपाययोजना आखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कडोंमपा हद्दीत करोना रुग्णांचा आकडा ७००च्या पुढे गेला आहे. यापूर्वी रोज १० ते १५ करोना रुग्ण सापडत होते. गेल्या काही दिवसांत हा आकडा ३० ते ४८ असा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी पालिकेने बाधित, संशयित आणि विलगीकरणातील एकूण सुमारे दीड हजार रुग्णांची सुविधा होईल, अशी व्यवस्था उभी केली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर, कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयांची दैनावस्था सर्वज्ञात आहे. या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साधनांचा तुटवडा अशी परिस्थिती आहे. पाच वर्षांपूर्वी टिटवाळा येथे ३० एकर जागेवर शासन प्रयत्नाने सर्वोपचारी रुग्णालय उभारण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण प्रयत्नशील होते. त्याला पालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

 

नवा पर्यायही अडचणीचा

क्रीडा संकुलातील १९ एकरची प्रशस्त जागा, प्रीमिअर कॉलनी मैदानांचा विचार करण्यात आला. पावसाळ्यात पाहता तंबू उभारून रुग्ण सेवा देणे कितपत लाभदायक ठरेल, असाही विचार प्रशासनाकडून करण्यात आल्याने या जागांचा नाद सोडण्यात आल्याचे कळते. जागा पाहणी सुरू असल्याने आणि निश्चिती होत नसल्याने कोणीही प्रशासकीय अधिकारी सध्या तरी या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाही.

तीन ठिकाणी पाहणी

महापालिका रुग्णालयांच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने कोविड रुग्ण सेवा देता येणे शक्य नसल्याने प्रशासनाने महापालिका हद्दीतील, बाहेरील प्रशस्त मोकळ्या जागा पर्यायी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पाहण्यास सुरुवात केली आहे. आजवर पालिका हद्दीत भग्नावस्थेत उभ्या असलेल्या ‘झोपु’ योजनेच्या उंबर्डे, कांचनगाव येथील इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहाची आयुक्तांनी पाहणी केली आहे. भिवंडीजवळील ग्रामीण भागातील जागांची शासन, पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:46 am

Web Title: difficulties in setting up a 1000 bed covid 19 hospital in kdmc area zws 70
Next Stories
1 ऑनलाइन मद्यविक्रीत दलालांमार्फत लूट
2 पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा  ‘कचरा’
3 उल्हासनगरात व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाई
Just Now!
X