मुंबई-ठाण्यातील तरुणांचा पुढाकार; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील पष्टेपाडा गावातील शाळेपासून सुरू झालेले डिजिटलायझेशन लोण आता ठाणे जिल्ह्य़ात सर्वदूर पसरले आहे. ग्रामस्थ, परिसरातील स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय शाळांमधील सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत. शाळा सक्षमीकरणाच्या या मोहिमेत आता वांगणीतील जिल्हा परिषद शाळेचाही कायापालट झाला असून येत्या शनिवारपासून शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांसह दृक्श्राव्य शिक्षण प्रणालीचा लाभ घेता येणार आहे.
संदीप गुंड या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने पष्टेपाडा शाळेत केलेल्या सुधारणांपासून प्रेरणा घेऊन आता अनेक तरुण ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेऊ लागले आहेत. मुंबई-ठाणे परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या एका समूहाने अशाच प्रकारे वांगणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र. ३ मध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारचे सामाजिक काम करण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी ‘वुई ऑल लाइव्ह टु हेल्प (वेल्थ)’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त अंजनडोह हे गाव दीड-दोन महिने दत्तक घेऊन तिथे सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या. जव्हार-मोखाडा भागातील कुपोषित मुलांना पोषण आहार देण्याच्या योजनाही त्यांनी राबविल्या. यंदा मात्र त्यांनी ग्रामीण भागातील एक शाळा दत्तक घेऊन तिथे काम करण्याचा निर्णय घेतला.
पष्टेपाडय़ाच्या संदीप गुंड या शिक्षकांचा त्यांच्यापुढे आदर्श होताच, मात्र संस्थेतील बहुतेक तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याने त्यांनी त्यात काही नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. कारण पष्टेपाडासारख्या दुर्गम भागातील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. वांगणीतील शाळेत मात्र पहिली ते सातवीच्या वर्गात तब्बल २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तिथे त्यांना थोडी वेगळी उपाययोजना करावी लागली. या शाळेत डिजिटल फळ्याऐवजी त्यांनी शाळेत ई-प्रशाळा प्रोजेक्टर बसविले आहे. या प्रोजेक्टरमध्येच सीपीयू असून त्याद्वारे पडद्यावर दृक्श्राव्य पद्धतीने अभ्यासक्रमातील हवा तो भाग दाखविता येण्याची सोय आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये असलेली शैक्षणिक साधनेही त्यांनी वांगणीच्या शाळेत उपलब्ध करून दिली आहेत. शाळेतील या प्रकल्पासाठी त्यांना थिंक शार्प संस्थेचे संतोष फड यांनी मदत केली आहे. संस्थेतील संज्योत मोरे, अरुणा सिंग, हृषीकेश झरेकर, विदिशा, सौरभ मंगरूळे आदी तरुण या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या तरुणांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ३५० पुस्तके असलेले एक ग्रंथालयही भेट दिली.

केवळ शाळा डिजिटल करण्यापुरते हे काम मर्यादित नाही. आठवडा-पंधरवडय़ातून आमच्यापैकी एकेक जण शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, चित्रकला आदी विषयांचे प्रशिक्षण देणार आहेत.
– सौरभ मंगरुळे, वेल्थ