तालुक्यातील १२४ प्राथमिक शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

येत्या पाच वर्षांत कल्याण ग्रामीण तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या १२४ प्राथमिक शाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त केल्या जाणार आहेत.  तालुका शिक्षण विभागाने ही माहिती दिली. शाळांमध्ये या सुविधा देण्याविषयी कार्यवाही शिक्षण विभागाने सुरू केली आहे. खासगी कंपन्यांच्या ‘सामाजिक सेवा निधीतून’ (सीएसआर) काही कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाव, खेडय़ा-पाडय़ांतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. तो तंत्रज्ञानस्नेही असला पाहिजे. शासनाच्या या धोरणानुसार शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण ग्रामीण तालुक्यातील आदिवासी, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड होऊ नये म्हणून दुर्गम भागात १७० आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये घरातील आर्थिक बेताची परिस्थिती, वर्षांनुवर्षांची गरिबी यामुळे शिक्षण न घेऊ शकणारी दुर्गम भागातील मुले निवासी पद्धतीने शालेय शिक्षण पूर्ण करीत आहेत.

तालुक्यात खासगी शाळांची संख्या १५४ आहे. उपक्रमशील शिक्षण, ज्ञानरचनावाद, मूल्यधिष्ठित शिक्षण अशा अनेक माध्यमांतून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बिहार, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक भागांतून अनेक नागरिक रोजगारासाठी कल्याण परिसरात येतात. या रहिवाशांची भाषा तेलुगू , कन्नड, मल्याळम असते. या रहिवाशांची मुले स्थानिक शाळेत येतात. त्यांना हिंदीशिवाय अन्य भाषेचे ज्ञान नसते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी हिंदी माध्यमातून त्याचबरोबर क्रमिक अभ्यासक्रमाची माहिती व्हावी म्हणून मराठीचे ज्ञान दिले जाते. शिळफाटा रस्त्यावरील पिसवली, सोनारपाडा, दावडी, गोळवली, मानपाडा परिसरात मोठय़ा प्रमाणात चाळी, झोपडय़ा आहेत. येथे हे स्थलांतरित विद्यार्थी मोठय़ा संख्येने आढळतात. त्यामुळे येथील प्राथमिक शाळांमध्ये स्थलांतरित विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षण, हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेचा वापर करून शिक्षण दिले जाते, असे कल्याण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले. डोंबिवली ग्रामीणमधील उसरघर येथील शाळा डिजिटल, ज्ञानरचनावाद, प्रयोगशील शिक्षणाने परिपूर्ण करण्यात आली आहे. ‘इनरव्हील क्लब’ डोंबिवली शाखेने या शाळेला दत्तक घेऊन विद्यार्थी, शाळा विकासासाठी आवश्यक शैक्षणिक साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची गती पाहून विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने येथे शिकवले जाते. त्यामुळे अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी अपेक्षित गती घेताना दिसतात. एक आदर्शवत उपक्रम म्हणून हा उपक्रम अन्य प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे, असे दहितुले यांनी स्पष्ट केले.