आपल्याकडे हल्ली पास्ता आणि पिझ्झा हे इटालियन आणि मेक्सिकन पदार्थ अगदी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत, परंतु हे इटालियन आणि मेक्सिकन पदार्थ मिळतात ते अगदी खास भारतीय पद्धतीने बनवलेल्या शैलीत, परंतु हे पदार्थ मूळच्या चवीत खाण्याची काही वेगळीच मजा आहे आणि ही मूळ चव चाखायला मिळते मीरा रोडच्या ‘डिलट्टो’मध्ये.

भाईंदर-काशिमीरा रस्त्यावरील जुन्या पेट्रोलपंपजवळ सुमारे दीड महिन्यापूर्वीच डिलेट्टो सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इटालियन आणि मेक्सिकन स्वादिष्ट पदार्थ तेही तज्ज्ञ शेफने बनवलेले डिलेट्टोमध्ये उपलब्ध आहेत. विशिष्ट प्रकारचे चीज, पनीरसारखे दुग्धजन्य पदार्थ, ताज्या भाज्या यामुळे इथल्या पदार्थाना मूळ इटालियन आणि मेक्सीकन चव मिळत असल्याचा दावा डिलेट्टोचे विशाल पाल सिंग करतात. डिलेट्टोमध्ये पास्ता, पिझ्झा, बर्गर यांसारखे फास्ट फूड तर मिळतेच शिवाय खास इटालियन सँडवीच, फजीटा यांच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्सही या ठिकाणी उपलब्ध आहेत.

इथे मिळणाऱ्या पदार्थासाठी वापरण्यात येणारे चीज. पनीर आणि भाज्या भारतीय नसून इटालियन, मेक्सिकन तसेच इंग्लिश आहेत. डिलेट्टोचे चालक ते खास मुंबईच्या बाजारातून आणतात, तसेच या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या वितरकांकडून मागवतात, त्यामुळेच इथल्या पदार्थाना त्यांची मूळ चव मिळत असते. डिलेट्टोमध्ये बेसील लिफ, चीज मार्गारिटा, अमेरिकन थीन क्रस्ट, मेक्सिकन ट्रीट, इटालियन ग्रीक थीन, िस्प्रग ग्रीन थीन आदी प्रकारचे पिझ्झा मिळतात. या सर्व पिझ्झांमध्ये वेगवेगळ्या बनावटीचे चीज, बेसील पाने, टोमॅटो, टोमॅटो क्रीम सॉस, पालक, ऑलीव्ह, वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, अमेरिकन आणि इंग्लिश भाज्या यांचा वापर केला जातो. याशिवाय ग्राहकाने सुचविलेल्या पद्धतीनेदेखील पिझ्झा बनवले जातात. पास्ताचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. यात पास्ता पिंक सॉस, पास्ता ट्रायो, अल्फ्रेडो पेन्ने पास्ता, पेन्ने अराबियाटा, चीजी पास्ता यांचा समावेश आहे. यातही चीज,  क्रीमी चीज, क्रीमी टॉमेटो सॉस, अमेरिकन कॉर्न, मशरूम, इटालीयन हब्र्ज, ओरेगानो चीली फ्लेक्स यांचा वापर केला जातो. बेक केलेल्या गार्लिक ब्रेड सोबत हे पास्ता दिले जातात.

इथे मिळणारे सँडवीचदेखील अगदी हटके असे आहेत. अगदी मुंबईच्या मोठय़ा रेस्तरांमध्येदेखील असे सँडवीच मिळणार नाहीत. इचर ठिकाणी वेगवेगळे सँडवीच तयार केले जात असले तरी सर्व सँडवीचसाठी एकच प्रकारचा ब्रेड वापरला जातो. डिलेट्टोमध्ये मात्र ट्राय अँगल ब्रेड सोबतच फ्लॅट पिटा ब्रेड, सियाबाटा ब्रेड, ग्रेनियाक ब्रेड, फोकासिया ब्रेड गार्लिक ब्रेड अशा ब्रेडच्या विविध प्रकारांचा वापर सँडवीच तयार करताना केला जातो. सँडवीचमध्ये भाज्या, मायोनिज, पनीर, लेटय़ुस, योगर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसचा वापर केला जातो.

एवढे सगळे हेवीवेट पदार्थ खाल्ल्यानंतर ते पचविणेही तितकेच महत्त्वाचे असते. यासाठीच डिलेट्टोमध्ये सॉफ्ट डिंक दिले जात नाही, तर खाल्लेले पदार्थ सहज पचण्यास मदत करतील असे वेगवेगळ्या प्रकारची मॉक्टेल्स या ठिकाणी मिळतात. वेगवेगळ्या फळाचे सिरप आणि सोडय़ाचा वापर करून अतिशय स्वादिष्ट अशी मॉक्टेल्स आणि तीदेखील अतिशय आकर्षक पद्धतीने या ठिकाणी दिली जातात.

डिलेट्टो

  • शॉप क्र. ९, न्यू चंदन अ‍ॅव्हेन्यू, तुंगा रुग्णालयासमोर, भाईंदर-काशिमीरा रोड, मीरा रोड (पूर्व)
  • वेळ : सकाळी ११ ते रात्री ११.३०