वसईतील उपाहारगृहाला भीषण आग

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील ‘आमचो कोळिवाडो’ या प्रसिद्ध उपाहारगृहाला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत संपूर्ण उपाहारगृह भस्मसात झाले. या उपाहारगृहाप्रमाणेच शहरातील अनेक उपाहारगृहांची अग्निसुरक्षा केली नसल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे ‘आमचो कोळिवाडो’ हे उपाहारगृह आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक उपाहारगृहाला आग लागली. उपाहारगृहातील कर्मचारी आणि काही ग्राहकांनी लगेच बाहेर धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. पाऊण तासांनतर आग विझवण्यात यश आले. उपाहारगृहातील सिलिंडर व्यवस्थित होते. त्यामुळे ही आग शॉटर्सिकटमुळे लागल्याचा अंदाज आहे, असे पालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले. या उपाहारगृहाने अग्निसुरक्षा करवून घेतली नव्हती. हॉटेलने अनधिकृत बांधकाम केले असेल तर त्याबाबत संबंधित प्रभाग समिती कारवाई करील, असेही पालव यांनी स्पष्ट केले.

मुख्य रस्त्यावर असलेल्या या उपाहारगृहाला आग लागल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वाहतूक थांबवली होती. दुपारची वेळ असल्याने उपाहारगृहामध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती.

उपाहारगृहांना अग्निसुरक्षा नाही

वसई-विरार शहरातील उपाहारगृहे, बीअर बार यांनी अग्निसुरक्षा केली नसल्याचा आरोप महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे. मी याबाबत वारंवार पालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अग्निसुरक्षा केली नाही. यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांच्या जिवाला नेहमी धोका असतो, असे त्यांनी सांगितले.