कुरगाव-तारापूर मार्गाची दुरवस्था ; वाहतुकीसाठी धोकादायक

कुरगाव-तारापूर या सागरी महामार्गावर पावसाळ्याअगोदर केलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. तब्बल २ कोटी ६६ लाख खर्च करून बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी सिलकोट व कारपेट केलेला डांबराचा थर निघून गेल्याने शासनाचा निधी वाया गेला आहे

कुरगावपासून सुमारे ६ किलोमीटर लांबीचा आणि ७.५  मीटर रुंदीच्या रस्त्याच्या या कामाला उन्हाळ्याच्या अखेरीस सुरुवात होऊन हे काम जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सुरू होते. मात्र पहिल्याच पावसात सील कोटचा थर पाण्यासोबत वाहून गेला. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत पालघर जिल्ह्य़ात पावाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. आदिवासी उपाययोजनेतील काही कामे न करताच बिलांची रक्कम अदा करण्यात आल्याचे आय.आय.टी. च्या सामाजिक लेखा परीक्षणात समोर आले आहे.

सागरी महामार्गावरील तारापूर बायपास येथे रस्ता उखडला गेला असून ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे शासनाचे कोटय़वधी रुपये वाया गेले आहेत.

पालघर जिल्हा होऊन चार र्वष झाल्यानंतर देखील या ठिकाणी बांधकाम साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळा नसल्याने नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रयोगशाळेतून बांधकाम साहित्य तपासणी अहवाल कागदोपत्री आणला जातो. त्यातच ई-निविदा पद्धत असून देखील ठरावीक ठेकेदार साखळी करून कामे आपल्याकडे ठेवतात असे देखील आरोप केले जात आहेत.

पाच वर्षांत दोन वेळा काम

कुरगाव-तारापूर रस्त्यावर याअगोदर देखील अनेक वेळा डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु डांबरीकरण करताना कारपेट व सिलकोटचा दर्जा चांगला नसल्याने हा थर निघून जातो. गेल्या पाच वर्षांत या रस्त्यावर दोन वेळा काम करण्यात आले आहे.

महिनाभरातच रस्त्यावर खड्डे पडल्याने ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. आवश्यकता नसताना देखील रस्त्यावर डांबरीकरण केले. ज्या ठिकाणी आवश्यकता असते तिथे मात्र कामे केली जात नाहीत.

-शुभांगी कुटे, जिल्हा परिषद सदस्य, तारापूर.