ऋषीकेश मुळे

कोपर स्थानकातील धक्कादायक प्रकार; कुलूपबंद स्वच्छतागृहाची चावी आणण्यासाठी जिन्यांवरून धावपळ

मध्य रेल्वेमार्गावरील कोपर स्थानकात अपंगांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या नावाने रेल्वे प्रशासनाने अपंग प्रवाशांची अक्षरश: चेष्टा केली आहे. स्थानकातील या स्वच्छतागृहाला नेहमीच टाळे असते आणि एखाद्या अपंग प्रवाशास या स्वच्छतागृहाचा वापर करायचा असल्यास त्याला वरील बाजूस असलेल्या स्थानकातील कार्यालयात जाऊन स्वच्छतागृहाची चावी घ्यावी लागते. यासाठी करावी लागणारी धावपळ त्रासदायक ठरत असल्याने अपंग प्रवाशांनी या स्वच्छतागृहाचा वापर करणेच बंद केले आहे.

रेल्वे स्थानक स्वच्छ राहावे याकरिता पश्चिम रेल्वे प्रशासनाने अनेक स्थानकांवर स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतागृहे स्वच्छ राहावीत यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या मोहिमेचे एक अंग म्हणून अपंग व्यक्तींसाठी रेल्वे स्थानकांमध्ये वेगळी स्वच्छतागृहे उभारली जावीत असा आग्रह धरण्यात आला. पश्चिम रेल्वे स्थानकावर अपंग व्यक्तींसाठी मोठय़ा प्रमाणावर स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावर कल्याणलगत असलेल्या कोपर स्थानकात अपंगांसाठी असेच स्वच्छतागृह उभारण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे.

कल्याण दिशेकडील बाजूस कोपर स्थानकाच्या टोकाला असणाऱ्या या स्वच्छतागृहाच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या बाहेरील भिंतीवर ‘दिव्यांग स्वच्छतागृहाची चावी स्थानक आरक्षण कार्यालयात उपलब्ध आहे’ असा संदेश देणारा फलक चिकटवण्यात आला आहे. एखाद्या अपंग व्यक्तीला स्वच्छतागृहात जायचे असल्यास त्या व्यक्तीला स्थानकाच्या वरील बाजूस असणाऱ्या वसई-कोपर या स्थानकावरील स्थानक आरक्षण कार्यालयात जाऊन किल्ली मागावी लागते. त्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छतागृहाजवळ येऊन स्वच्छतागृहाचे जड असलेले शटर उघडावे लागते. त्यानंतर पुन्हा ते शटर बंद करून ती किल्ली स्थानक आरक्षण कार्यालयात जाऊन द्यावी लागते. त्यामुळे मुळातच शरीराचे अवयव साथ देत नसताना अपंग व्यक्तींना जिने चढून जाऊन किल्लीसाठी आणण्यासाठी आणि नेऊन देण्यासाठी खटाटोप करणे कठीण होते. रेल्वे स्थानकातील तसेच स्वच्छतागृहातील सुरक्षेच्या प्रश्नामुळे अपंग स्वच्छतागृहाला कुलूप लावल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

‘स्वच्छतागृहामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या खबरदारीच्या दृष्टिकोनातून कोपर रेल्वे स्थानकातील दिव्यांग स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले आहे.’

– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे