चालाल तर वाचाल..हा संदेश देत गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक, वृद्ध , अपंगांच्या पदयात्रा आश्रय क्लब व संजीवनी मधुमेही मंडळाकडून काढल्या जातात. या वेळी एका अपंग तरुणीने डोंबिवली ते शहाड (बिर्ला मंदिर) हे ११ किलोमीटरचे अंतर कोणाचेही साहाय्य न घेता स्वबळावर पार पाडले.
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी चालण्याची खूप गरज आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त चाकरमानी चालायचा कंटाळा करतात. एखादा आजार जडला की मग डॉक्टरांच्या सल्ल्याने चालणे, व्यायाम वगैरे सुरू होतो. डोंबिवलीतील आश्रय क्लब ही संस्था अनेक वर्षांपासून शहरातील विविध गटातील नागरिकांना एकत्र करून कर्जत, नेरळ, शिळफाटा, टिटवाळा, मलंगगड येथे पदयात्रा काढते. संयोजक डॉ. अरुण पाटील पदयात्रेचे नियोजन करतात. यावेळी पंधरा जणांच्या एका चमूसाठी डोंबिवली ते शहाड (बिर्ला मंदिर) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे अपघातात गुडघ्यापासून पाय गमावलेली रोशनी पाटेकर ही तरुणी या पदयात्रेत सहभागी झाली होती. कोणताही आधार, थांबा न घेता रोशनीने हे अंतर पार केले.