News Flash

आदिवासी, ग्रामीण महिलांची गैरसोय

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये करोना महासाथ सुरू झाली. राज्याची आरोग्य यंत्रणा महासाथ रोखण्याच्या कामात व्यग्र झाली.

|| भगवान मंडलिक

सॅनिटरी नॅपकिन वाटपाच्या ‘अस्मिता’ योजनेला फटका; आशा सेविका, आरोग्य यंत्रणा करोना साथ नियंत्रणात व्यग्र

कल्याण : राज्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांना मासिक पाळी सुरू असताना सॅनिटरी नॅपकिन वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने पाच वर्षांपूर्वी अस्मिता योजना सुरू केली. मात्र सध्या सुरू असलेल्या करोना महासाथीचा फटका या योजनेला बसला आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून सहा रुपयांचे सहा सॅनिटरी नॅपकिन असलेले पाकीट तळागाळात काम करणाऱ्या आशा सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागांत दिले जाते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून आशा सेविका, आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा करोना साथ नियंत्रणात व्यग्र असल्याने सॅनिटरी नॅपकिन वाटपाचा विषय बाजूला पडला आहे.

ग्रामीण महिलांचे आरोग्य विचारात घेऊन सात वर्षांपूर्वी केंद्र शासनाने औषध मंत्रालय आणि रसायन व खत मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार कोटींचे सॅनिटरी नॅपकिन देशभरातील तळागाळातील महिलांना पोहोचविण्याचा आराखडा तयार केला. पंतप्रधान भारतीय जनशुद्धी योजनेच्या माध्यमातून ‘सुविधा पॅड’चे महिलांना वाटप केले जात होते. आता ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या माध्यमातून राबविली जात आहे.

राज्य सरकारने महिला स्वयं साहाय्यता गटांचे सहकार्य घेऊन आशा सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी, दुर्गम वाडी-पाड्यावर जाऊन तरुणी, महिलांना सहा सॅनिटरी नॅपकिन रास्त दरात देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण महिलांना तालुका, बाजाराच्या ठिकाणी न जाता घराच्या दारात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत असल्याने त्यांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळतो, असे आशा सेविका सांगतात.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये करोना महासाथ सुरू झाली. राज्याची आरोग्य यंत्रणा महासाथ रोखण्याच्या कामात व्यग्र झाली. ग्रामीण तळागाळात काम करणाऱ्या आशा सेविका, स्वयं साहाय्यता गटातील महिला कार्यकत्र्या करोनामुळे घरोघरचे सर्वेक्षण, रुग्णांची माहिती संकलन या कामात व्यग्र झाल्या. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून येणारे सॅनिटरी पॅड वाटपाचे काम बाजूला पडले. टाळेबंदीमुळे आशा सेविकांच्या भ्रमंतीवर निर्बंध आले. वेळीच वाहने उपलब्ध नसल्याने गाव, डोंगरपाड्यात जाण्याचे प्रश्न निर्माण झाले. जिल्ह्याकडून स्वयं साहाय्यता गटांना आशा सेविकांच्या साहाय्याने वाटप करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा व्हायचा तो ठप्प झाला. राज्यातील रत्नागिरी, वैजापूर, नागपूर अशा काही जिल्ह्यांच्या अनेक भागांत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप ठप्प आहे. आपण स्वत: या भागातील आशा सेविकांशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वर्षभरात सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा आला नसल्याचे सांगितले. महिलांचे आरोग्य, मासिक पाळीनंतरची स्वच्छता विषयावर मागील अनेक वर्षे ‘डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटी नया सयेरा’ संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ यांनी सांगितले.

अनेक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सॅनिटरी नॅपकिन वाटपाची माहिती घेतली. बहुतांशी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे साठा आहे. तो वाटप करणे शिल्लक आहे, असे सांगितल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. महासाथ नियंत्रणाच्या कामामुळे या वेळी नॅपकिन वाटपात अडथळे आल्याची कबुली काही अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे येथील कुटुंब कल्याण विभागाशी डॉ. गाडगीळ आणि प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला त्या वेळी त्यांनी सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा उपलब्ध करून त्याचे वाटप या विषयीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शासनस्तरावर या विषयीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तात्काळ नॅपकिन उपलब्ध करून तो वाटप करण्याचे काम हाती घेतले जाईल.

मासिक पाळीनंतरची स्वच्छता या विषयावर राज्याच्या गाव, दुर्गम, आदिवासी भागातील तरुणी, महिलांशी नियमित आभासी बैठकीत संवाद साधते. अनेक महिलांनी वर्षभरात स्थानिक पातळीवर

आशासेविकांच्या माध्यमातून रास्त दरात उपलब्ध होणारे सॅनिटरी नॅपकिन मिळाले नसल्याची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी, कुटुंब कल्याण विभागाशी संपर्क साधून हे साधन लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. – डॉ. स्वाती गाडगीळ, अध्यक्ष, डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:08 am

Web Title: disadvantage of tribal rural women sanitary napkin asmita scheme akp 94
Next Stories
1 अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सज्जतेचे आदेश
2 ठाणे शहरात फिरते लसीकरण केंद्र
3 ठाणे जिल्ह्य़ात बाजारपेठांमध्ये झुंबड
Just Now!
X