विविध संकेतस्थळांवर भेटवस्तूंचे संच सवलतीच्या दरांत

भाग्यश्री प्रधान, ठाणे</strong>

यंदा विविध सवलतींमुळे ग्राहकांसाठी नाताळही दिवाळीप्रमाणे सुखावणारा ठरणार आहे. विविध संकेतस्थळांवर ६० ते ७० टक्के सवलतीच्या दरात सजावटीच्या वस्तू, कपडे उपलब्ध आहेत. भेटवस्तू, खेळण्यांवर मोठय़ा प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. फुले, केक आणि वाईन एकत्रित घेतल्यास सवलत देण्यात येणार असल्याने ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.

सजावटीचे साहित्य एकत्र खरेदी केल्यास काही सवलती देण्यात आल्या आहेत. सजावटीसाठी तारे, फुले, विविध रंगाच्या विजेच्या माळा, मेरी ख्रिसमस लिहिलेली पट्टी, ख्रिसमस ट्री, सांताची प्रतिकृती, चॉकलेट्स अशा साहित्याचे संचे ९९९ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. सांताच्या आकाराचे सिलीकॉनचे मग, सातांचे चित्र असणारी उशी, पर्स, खेळणी अशा वस्तूंचा यात समावेश आहे. काही संकेतस्थळांवर केकसाठी विविध कुपन्स आणि सवलतींचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये ‘डील कोड’ देण्यात आले आहेत. या कोडनुसार प्रत्येक केकवर १५० ते ३५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. पर्क, डेअरी मिल्क, किटकॅट, फाइव्ह स्टार, गुड डे, बटर बिस्किट, बॉरबॉन, आलुभुजिया आणि मसाला मूग अशा खाऊची ६९९ रुपयांची टोकरी ५९९ रुपयांत उपलब्ध आहे.

नाताळसाठी काही संकेतस्थळांवर गाऊन आणि कुर्त्यांवर ७० टक्के सवलत देण्यात आली आहे. ख्रिसमस ट्रीही ६० ते ७० टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. सांताने घातलेली टोपी नेहमीच लहान मुलांचे आकर्षण ठरते. ऑनलाइन खरेदी करताना ही टोपीही ६० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. संकेतस्थळांवर अशा सवलती देण्यात येत असल्याने सण जवळ आल्यावर ही खरेदी फायदेशीर ठरते, असे रेहा डिसोझा यांनी सांगितले.

केक, फुले, वाईन

फुले, केक आणि वाईन किंवा फळांची टोपली, फुले आणि वाईनची बाटली अशा भेटवस्तूही ऑनलाइन उपलब्ध आहे. या भेटवस्तूची किंमत दोन हजारांपर्यंत असून यामध्ये विविध प्रकारच्या वाईनचे पर्याय आहेत. वाईन ठेवण्यासाठी विविध आकारातील बाटल्याही ५० ते ५५ टक्के सवलतीच्या दरात ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत.

अन्य सवलती

या वर्षांची अखेर आणि नव्या वर्षांच्या सुरुवातीला फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, प्रवासाचे साहित्य, पादत्राणे यावर  सवलत देण्यात आली आहे. ही सवलतही ७० ते ८० टक्क्य़ांपर्यंत असून ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहक सरसावले आहेत.