‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते का?’ या विषयावर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाला शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करताच ठाणे पोलिसांनी यासंबंधीचा ‘ना हरकत दाखला’ मिळेपर्यंत गडकरी रंगायतन परिसंवादासाठी उपलब्ध करून देऊ नये, असे पत्र महापालिका प्रशासनाला पाठविल्यामुळे या मुद्दय़ावरून नवा वाद उभा राहिला आहे. मुस्लीम यूथ फेडरेशन या संस्थेतर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्यास परवानगी दिली नव्हती. दरम्यान, एखाद्या विषयावर चर्चा होऊच द्यायची नाही, असा प्रयत्न काही मंडळी करू लागली असून सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांचा या हिंदूुत्ववादी संघटनांना पाठिंबा असल्याने पोलीस दबावाखाली आहेत, असा आरोप मुस्लीम यूथ फेडरेशन या संस्थेचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केल्याने हा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदूू-मुस्लीम असा भेदभाव केला नाही. मात्र, काही ठरावीक राजकीय पक्ष आणि संघटना त्यांच्यावर ठरावीक धर्माचा शिक्का मारत ते मुस्लीमविरोधी असल्याचा प्रचार करतात. या मुद्दय़ावर सखोल चर्चा व्हावी यासाठी येत्या शनिवारी मुस्लीम यूथ फेडरेशन या संस्थेतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते का’ या विषयावर गडकरी रंगायतन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.