कल्याण : करोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवरील नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर नोंदणी होण्यात अडचणी येत असून जुलैपर्यंत प्रतीक्षा यादी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लसीकरण केंद्रांची माहिती, स्लॉट पद्धतीची माहिती मिळत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

केंद्र सरकारने १८ वर्षापुढील रहिवाशांसाठी करोना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर रहिवासी मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांच्या बाहेर रांगा लावत आहेत. बहुतांशी रहिवासी ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आहेत. आम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येत नाही, तुम्हीच लसीकरण केंद्रांवर आमची माहिती भरून घ्या आणि आम्हाला लस द्या, अशी आग्रही मागणी ज्येष्ठांकडून केली जात आहे. तशी पद्धत नसल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा नाइलाज होत आहे.  कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली की नोंदणीकरण केल्याचा संदेश येतो. तुम्हाला जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असा संदेश येतो. यासंदर्भात लाभार्थी लसीकरण केंद्र, रुग्णालयांमध्ये जाऊन विचारणा करीत आहेत. लसीकरणाची नोंदणी जुलैपर्यंत पूर्ण झाली असल्याने तुम्हाला त्यानंतरच लस मिळेल असे उत्तर महापालिका केंद्रातून दिले जाते. लासीकरणाच्या प्रक्रिया केंद्रीभूत असल्याने कर्मचाऱ्यांना हाताने कागदावर कोणत्याही प्रक्रिया करायच्या नाहीत. लस घेणाऱ्यांमधील बहुतांशी वर्गाला ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून लस घेणे पसंत नाही.