मुलुंड चेकनाका, कळवा, दिवा परिसरातील प्रकार; सर्वसामान्य नागरिकांची नाराजी

ठाणे शहरात सध्या खुल्या ‘बार’ना उधाण असून मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोरील मोकळ्या जागा किंवा पदपथांवर बसून मद्यप्राशन केले जात आहे. मुलुंड चेकनाका, कळव्यातील दत्तवाडी, दिव्यातील प्रेरणा टॉवर परिसर या भागांमध्ये दररोज सायंकाळी अशा प्रकारे मद्यप्राशन करणारे सर्रास दिसून येत आहेत. या तळीरामांमध्ये अनेकदा वाद-तंटे उडत असल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य पादचाऱ्यांना होऊ लागला आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मुलुंड चेकनाका येथील ऐन वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील पदपथावरच तळिराम मद्य प्राशन करत असतात. या ठिकाणी मालवाहतूक करणारी अवजड वाहने उभी करण्यात येतात. या वाहनांच्या आड पदपथांवर चायनीज पदार्थविक्री करणाऱ्या खाद्यविक्रेत्यांनी चक्क टेबलखुच्र्या मांडल्या आहेत. दररोज सायंकाळी येथे अनेक जण चायनीज पदार्थावर ताव मारताना दारूचे पेग रिचवत असल्याचे आढळून येते. मुलुंड चेकनाका परिसरात रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. तसेच या मद्यपाटर्य़ाही मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत असते. अशा वेळेस पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथांचा आधार घ्यावा लागतो. मात्र हे पदपथही मद्यपाटर्य़ाचे अड्डे बनले आहेत.

कळवा येथील दत्तवाडी परिसरातही सायंकाळच्या वेळेस काही व्यक्ती उघडय़ावरच मद्यप्राशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रहिवाशी संकुलांचा परिसर असणाऱ्या या भागातून नागरिकांची मोठी ये-जा असल्याने तळिरामांमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दिव्यातील प्रेरणा टॉवर परिसरासमोर असणाऱ्या मैदानात देखील तळिरामांनी धुडगूस घातल्याचे पाहायला मिळत आहे. समोरच्या मद्यविक्री केंद्रातून मद्य विकत घेऊन समूहाने तळिराम या मैदानात मद्यप्राशन करत असतात. दरम्यान, दिवा स्थानकाच्या दिशेने जाणारा रस्तादेखील याच भागातून जात असल्यामुळे या परिसरात इतर पादचाऱ्यांचीही मोठी ये-जा असते. येथील तळिरामांमध्ये अनेकदा भांडणे होऊन आपापसात हाणामारी होत असल्याचे दिसून येते. ठाण्यातील ज्ञानदेव शाळा परिसर, २२ क्रमांक मार्ग या भागातही सायंकाळच्या वेळेस तळिराम उघडय़ावर बसून मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले आहे.

मुलुंड चेकनाका परिसरात पदपथांवर बसून काही व्यक्तींकडून मद्यप्राशन होत असल्यास संबंधितांवर ताबडतोब कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पादचाऱ्यांना पदपथावरून चालताना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. – ए. एस. पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट, ठाणे</strong>