20 October 2019

News Flash

‘जीपीएस’च्या माध्यमातून पतीच्या अपघाताचा उलगडा

मोबाइलवरील जीपीएस यंत्रणेद्वारे शोध घेत त्या अपघातस्थळापर्यंत पोहचल्या आणि तिथले चित्र पाहून त्यांना धक्काच बसला.

(संग्रहित छायाचित्र)

सचिन काकोडकर यांच्या कुटुंबावर शोककळा

घोडबंदर येथील मुल्लाबाग परिसरात मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ात कार उलटून मृत्युमुखी पडलेल्या सचिन काकोडकर (३७) यांच्या अपघाताचा उलगडा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून झाला. येऊर येथील महत्त्वाचे काम आटोपल्यानंतर सचिन काकोडकर हे लोकमान्यनगर येथे सासरवाडीला जाऊन पत्नी श्वेता यांना घरी घेऊन येणार होते आणि त्यासाठी पहाटेपासूनच श्वेता या मोबाइलवरून सचिन यांना संपर्क साधत होत्या, पण त्यांच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. अखेर मोबाइलवरील जीपीएस यंत्रणेद्वारे शोध घेत त्या अपघातस्थळापर्यंत पोहचल्या आणि तिथले चित्र पाहून त्यांना धक्काच बसला.

वाघबीळ येथील आकाशगंगा सोसायटीमध्ये सचिन काकोडकर (३७) हे राहत होते. आई-वडील, पत्नी श्वेता आणि चार वर्षांचा मुलगा श्लोक असा त्यांचा परिवार. ते डेन्टिस्ट टेक्निशियन म्हणून काम करीत होते. श्वेता या लोकमान्यनगर येथे माहेरी गेल्या होत्या. येऊर येथील काम आटोपल्यानंतर सचिन हे तिला बुधवारी पहाटे कारने घरी घेऊन जाणार होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत सचिन हे घरी पोहचले नव्हते आणि त्यांचा मोबाइलवरही संपर्क होत नव्हता. रात्री दोन वाजता या दोघांचे एकमेकांशी मोबाइलवर बोलणे झाले होते. त्यानंतर मात्र श्वेता यांचा सचिन यांच्याशी मोबाइलवरून संपर्क झाला नाही. मोबाईलवर संपर्क होत नसल्यामुळे चिंतेत पडलेल्या श्वेता यांनी मोबाइल जीपीएस यंत्रणेद्वारे सचिन यांच्या कारचे ठिकाण शोधून काढले. या यंत्रणेद्वारे मुल्लाबागजवळ सचिन यांची कार असल्याचे कळताच श्वेता यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तिथे त्यांच्या कारचा त्यांनी शोध सुरू केला. त्याचवेळेस टीएमटीचे काही कामगार त्यांना भेटले आणि त्यांनी सचिन यांच्या अपघातग्रस्त वाहनाकडे त्यांना नेले. या अपघाताचे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. श्वेता या घटनास्थळी पोहचण्यापूर्वी बस आगारातील कर्मचाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला अपघाताबाबत कळविले होते. त्यामुळे काही क्षणातच पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. या यंत्रांनी सचिन यांना कार बाहेर काढून बेथनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पंरतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरातील कमविता तरुण मुलाचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

यापूर्वी सचिन हे ठाण्यातील कोपरी परिसरात राहत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आकाशगंगा सोसायटीत घर घेतले होते. तेव्हापासून ते या घरामध्ये राहत होते. त्यानंतर त्याच्या दोन जिवलग मित्रांनीही याच इमारतीत घर घेतले असून याठिकाणी त्यांचे दोघे मित्र राहत आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच त्यांनाही धक्का बसला. सचिनला विविध खाद्यपदार्थ बनविण्याची आवड होती आणि तो आम्हाला असे पदार्थ बनवून द्यायचा,  अशा आठवणी सांगताना सचिनचा मित्र विवेक बच्छाव यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

बाबा सुपरमॅन..

सचिन यांचा मुलगा श्लोक हा रात्री कुणाकडेच राहत नाही. त्याला सचिन यांच्यासोबतच झोपण्याची सवय आहे. ‘बाबा सुपरमॅन आहेत आणि सगळ्यात भारी आहेत’, असे श्लोक म्हणत असतो, असे सचिनच्या नातेवाईकांनी सांगितले.

First Published on May 16, 2019 12:34 am

Web Title: disposal of husbands accident through gps