पंधरा दिवसांपासून पहिली मात्रा मिळण्यातही अडचणी

कल्याण : करोना प्रतिबंधित लशीची पहिली मात्रा घेऊन १०० हून अधिक दिवस होत आले तरी दुसरी मात्रा मिळण्यात अडचणी येत असल्याने लाभार्थी रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिक पहिली मात्रा घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनाही गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ पालिकेच्या केंद्रांवर लस उपलब्ध होत नाही असे चित्र आहे. शासकीय केंद्रांवर लसींचा खडखडाट असल्याने अनेक रहिवाशांनी खासगी रुग्णालयांची वाट धरली आहे.

शासनाकडून लशीचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २२ लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येत नाहीत. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी शासनाच्या आरोग्य विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी पालिका हद्दीतील रहिवाशांचे लसीकरण वेळेत पूर्ण होण्यासाठी सहा लाख मात्रांची मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेला दररोज सुमारे २५ ते २६ हजार लस मात्रा उपलब्ध झाल्या तर नियोजित वेळेत प्रशासनाला लाभार्थीचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होणार आहे, असे डॉ. पाटील यांनी शासनाला कळविले आहे.

‘खासगी रुग्णालयांना त्यांच्या मागणीतील २५ टक्केसाठा उपलब्ध करून द्यावा. हा साठा खासगी रुग्णालयांना स्वतंत्रपणे उपलब्ध झाला तर लसीकरण वेगाने करणे शक्य होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालयांनाही लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. तो वेळेत उपलब्ध करून द्यावा. याचे सर्व नियंत्रण जिल्हाधिकारी किंवा जिल्हा आरोग्य विभागाने ठेवावे म्हणजे कोणताही गोंधळ उडणार नाही,’ अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीतील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाचे संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. एम्स रुग्णालयात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक लस घेण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाभार्थीची गर्दी असते. अशीच गर्दी इतर खासगी रुग्णालयांमध्ये असते, असे डॉ. शिरोडकर यांनी सांगितले. कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी तीन महिन्याचा आहे. किमान ८४ दिवसांनंतर ही मात्रा घेतली पाहिजे. अनेक लाभार्थीनी पहिली मात्रा घेऊन ८४ हून अधिक दिवस झाले आहेत, अशी माहिती काही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.

शासनाकडून लशीचा साठा उपलब्ध होतो. त्याप्रमाणे पहिली, दुसरी मात्रा याचा विचार करून लस देण्याचे आणि केंद्रे सुरू ठेवण्याचे नियोजन केले जाते. दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थीना वेळेत लस मिळावी यासाठी दुसऱ्या मात्रेसाठी काही दिवसांपासून केंद्रे सुरू ठेवली जात आहेत. खासगी रुग्णालयांच्या लस साठय़ासंदर्भातली माहिती आपणाकडे नाही.

– डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी