21 September 2020

News Flash

मुंबईसारखी मोकळीक द्या!

ठाणे, डोंबिवलीत दुकाने खुली करण्यासाठी व्यापारी आग्रही

ठाणे, डोंबिवलीत दुकाने खुली करण्यासाठी व्यापारी आग्रही; अंबरनाथ, बदलापुरातही आंदोलनाचा इशारा

ठाणे : मुंबई महापालिकेने शहरातील सर्व दुकाने आठवडाभर खुली करण्यास परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील व्यापारीही अशाच परवानगीसाठी आग्रही झाले आहेत. समविषम पद्धतीनेच दुकाने खुली करण्याच्या निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. ठाण्यातील व्यापाऱ्यांनी या प्रश्नावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींची भेट घेतली. तर, डोंबिवलीत व्यायामशाळा मालकांनी संघटितपणे निर्बंधांना विरोध केला. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनीही या निर्बंधांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर तसेच अंबरनाथ आणि बदलापूर पालिका प्रशासनाने पंधरा दिवसांपुर्वी टाळेबंदी शिथिल करत अतिसंक्रमित नसलेल्या भागात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू केली आहेत. गेले चार महिने टाळेबंदीमुळे दुकाने, बाजारपेठा बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच सध्या महिन्यातून १५ दिवसच दुकाने सुरू ठेवावी लागत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक सण-उत्सव येत असल्याने दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच दुकाने सुरू ठेवल्यास गर्दी विभागली जाईल व करोनाचा धोकाही कमी होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना नुकतेच पत्र पाठवून शहरातील सर्वच दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यातच सोमवारी मुंबई महापालिकेने आठवडय़ातील सातही दिवस दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे आपली मागणी पुढे केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली असून या सर्वानी शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती ‘ठाम’ या व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मितेश शहा यांनी दिली.

सम-विषम पद्धतीऐवजी आठवडय़ातील सातही दिवस सर्वच दुकाने सुरू ठेवण्याची मागणी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील व्यापाऱ्यांकडून होत आहे. सम-विषम पद्धतीमुळे सण-उत्सवाच्या काळात दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी सर्वच दुकाने सुरू ठेवणे गरजेचे आहे. तसेच परराज्यातून, राज्यातून विविध मालांची वाहतूक करणारी वाहने सम-विषमनुसार प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे मालाची चढ-उतार करण्यासाठी सम-विषम पर्याय कुचकामी ठरत असल्याचेही उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी

ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदी शिथिलीकरणानंतर व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या चार महिन्यांपासून इतर व्यवसायाप्रमाणेच व्यायामशाळाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. यातूनच आता व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी होऊ लागली असून अशा प्रकारची मागणी डोंबिवली ओनर्स जिम असोसिएशनच्या वतीने मंगळवारी करण्यात आली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी एकत्र येऊन टाळेबंदीतील निर्बंधांचा निषेध केला. ‘करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने आम्ही शासनाच्या नियमाचे पालन करीत आहोत. परंतु आता इतर क्षेत्राला ज्याप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. अनेक व्यायामशाळांचे मालक आर्थिक अडचणीत असून अनेकांचे व्यायामशाळेच्या जागेचे भाडे आणि वीज बिल थकले आहे. यामध्येही सवलत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे,’ अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी निखिल अनम यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:38 am

Web Title: dissatisfaction among thane traders against the restriction on opening shops in odd even manner zws 70
Next Stories
1 धरण क्षेत्राकडे मात्र पावसाची पाठ
2 टाळेबंदीमुळे आरटीओच्या महसुलातही लक्षणीय घट
3 पालिकेच्या तिजोरीला मालमत्ता कराचा आधार
Just Now!
X